नागपूर : राज्यातील ११०हून अधिक शेतकऱ्यांची १.६५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या कृषी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचे नागपुरातदेखील जाळे असल्याची बाब समोर आली आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून नफ्याचे आमिष दाखवत महारयत ॲग्रो इंडिया प्रा. लि. व रयत ॲग्रो इंडिया लि.च्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार केला होता. आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या गुन्ह्याचा तपास सुरू असून, संस्थापक सुधीर मोहिते याला कोल्हापूर येथून प्रोडक्शन वॉरंटवर चौकशीसाठी नागपुरात आणले आहे.
सुधीर मोहिते (३२, कडेगाव, सांगली), कंपनीचा संचालक संदीप सुभाष मोहिते (३३, कडेगाव, सांगली) व कंपनीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची १ कोटी ६४ लाख ९३ हजारांनी फसवणूक केली होती. २०२० साली कळमेश्वर येथील विकास मेश्राम (६४) यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान कंपनी रजिस्ट्रारकडून माहिती मागविण्यात आली होती. आरोपी हे २०१८ सालापासून कंपनीत संचालकपदावर कार्यरत होते. आरोपींची चौकशी आवश्यक असल्याने पोलिसांनी न्यायालयात कोठडीसाठी धाव घेतली होती. न्यायालयातून प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यावर पोलिसांनी कोल्हापूर येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुधीर मोहितेला नागपुरात आणले. त्याला २८ तारखेपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
आरोपींनी नागपूर जिल्ह्यातदेखील अनेकांना गंडा घातला होता. यासंदर्भात तक्रारी असणारे किंवा काही पुरावे असणाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस भवनातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी केले आहे.