नागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी जुनी कामठी येथील खून प्रकरणातील मुख्य आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ५ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
बबन अमर बक्सरे (४५) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचा मुलगा विजितला १ वर्ष कारावास व २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा जखमी करण्याच्या गुन्ह्यात झाली. बबनची पत्नी कुसुमला निर्दोष सोडण्यात आले. न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी हा निर्णय दिला.
मृताचे नाव किशोर महतो होते. ही घटना २३ जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. महतो यांच्या अंगणात लावलेल्या पडद्यावरून आरोपींनी वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी महतो यांच्यावर चाकू, काठी व दगडाने हल्ला केला. त्यामुळे महतो यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. महतो यांची पत्नी सीमा यांनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली होती.