झेंडूची फुले तोडल्यावरून झालेल्या खुनातील आरोपीची जन्मठेप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 08:57 PM2022-03-07T20:57:23+5:302022-03-07T20:57:57+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने झेंडूच्या फुलांवरून झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने झेंडूच्या फुलांवरून झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.
रुपेश ऊर्फ बबल्या हरीश्चंद्र सतीबावणे (वय ४६) असे आरोपीचे नाव असून तो शंकरपूर (ता. चिमूर) येथील रहिवासी आहे. मृताचे नाव रामू धरणे होते. रामूने घराच्या अंगणात झेंडूची झाडे लावली होती. घटनेच्या चार महिन्यांपूर्वी आरोपीने रामूच्या परवानगीशिवाय झेंडूची फुले तोडली. त्यावरून रामूने आरोपीला हटकले. दरम्यान, त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. रामूने आरोपीला काठीने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने रामूविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती; परंतु या मारहाणीचा राग आरोपीच्या मनात खदखदत होता. त्यातून १५ मार्च २०१३ रोजी आरोपीने रामूचा चाकूचे वार करून खून केला.
आरोपीचे अपील फेटाळले
३ जुलै २०१७ रोजी वरोरा सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.