नागपूर : ओरिसा राज्यात भारतीय स्टेट बॅंकेची कॅशव्हॅन लुटण्याच्या टोळीतील सदस्यांना नागपुरातील लकडगंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली. खबऱ्यांच्या नेटवर्कमधून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व आरोपी इतक्या मोठ्या गुन्ह्यात अडकला असल्याची बाब समोर आली आहे. या गुन्हेगाराला लवकरच ओडिसा पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे.
जयराम तिर्थवास माझी (३३, चिनागुडा, नयापरा, ओरिसा) हा भारतीय स्टेट बॅंकेच्या एटीएम कॅशव्हॅनचा चालक होता. त्याने दोन दिवसांअगोदर त्याच्या साथीदारांच्या मदतीने तो चालवत असलेली कॅशव्हॅनच लुटली. लुटपाट केल्यानंतर आरोपींनी रक्कम आपापसात वाटून घेतली व सर्व जण फरार झाले. जयराम नागपुरात आला व तो निकालस मंदिराजवळ फिरत होता. त्याच्याजवळ जास्त रोख रक्कम असल्याची बाब एका खबऱ्याच्या लक्षात आली. त्याची वागणूक संशयास्पद वाटत असल्याने खबऱ्याने तातडीने लकडगंज पोलीस ठाण्याला माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली व निकालस मंदिर मार्गावरील इतवारी लाल शाळेजवळ तो आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे २ लाख १२ हजार ७५० इतकी रोख रक्कम आढळून आली. इतकी रोख रक्कम आढळल्याने पोलिसांनी त्याची विचारपूस सुरू केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने ओरिसामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक अमिता जयपूरकर, धीरज मसराम, अरुण धर्मे, महेश जाधव, अभिषेक शनवारे, शकील शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ओरिसा पोलिसांच्या ताब्यात देणार
जयरामने गुन्ह्याची कबुली दिली असता खातरजमा करण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ओरिसातील राजाखरीयार पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. या टोळीने नुकतीच कॅशव्हॅन लुटली होती व ६ जुलै रोजी पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद झाली असल्याची बाब स्पष्ट झाली. ओरिसा पोलीस नागपुरात येणार असून त्यांना जयरामचा ताबा देण्यात येईल.