लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पांढराबोडीतील कुख्यात गुंड अक्षय बाबूलाल जयपुरे (वय २५, रा. सुदामनगरी) याची हत्या करून फरार झालेले आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान, आरोपी रोशन सनेश्वर (वय २८) आणि अमर येरकुडे (वय २६) हे दोघेही कुख्यातच आहेत. त्यांनी जुन्या वैमनस्यातून जयपुरेचा गेम केल्याची चर्चा आहे.
जयपुरे सराईत गुन्हेगार होता. एका मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला नागपुरातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीचा अवधी संपायचा असतानाच तो नागपुरात दिसून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए लावून त्याला कारागृहात डांबले होते. सहा महिन्यांपूर्वी तो कारागृहातून परतला आणि पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला. विशेष म्हणजे, आरोपी सनेश्वर आणि येरकुडेची त्याच्यासोबत मैत्री होती. मात्र, जयपुरे कुणालाही मारहाण करत असल्याने त्यांच्यात वैर निर्माण झाले. मंगळवारी रात्री आरोपीच्या एका मित्राला जयपुरेने मारहाण केली. त्यामुळे आरोपी संतप्त झाले. त्यांनी जयपुरेचा काटा काढण्याची तयारी केली. त्यानुसार, जयपुरेला आरोपींनी बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास चर्चा करण्याच्या बहाण्याने बोलवून घेतले. तेथे पोहचताच जयपुरेच्या डोक्यावर सिमेंटचे गट्टू मारून त्याची हत्या केली. बाबुलाल बापुराव जयपुरे (वय ४८) यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपी सनेश्वर आणि येरकुडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. ते फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
---
खरे कारण अंधारात
जयपुरेच्या हत्येचे खरे कारण अद्याप पुढे आलेले नाही. पोलीस त्याबाबत अनभिज्ञता दर्शवितात. जयपुरे सराईत गुन्हेगार असला तरी कारागृहातून परतल्यानंतर त्याने एकही गुन्हा केला नसल्याचे पोलीस म्हणतात. दुसरीकडे आरोपी सनेश्वर याने यापूर्वीही एकाची हत्या केली होती तर येरकुडे याच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. मित्राला मारले म्हणून त्यांनी जयपुरेची हत्या केल्याचे कारण पटण्यासारखे नाही. त्यांच्यात नाजूक मुद्यावरून वाद असावा, असा संशय आहे.
---