लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुण्यात कार्यरत असलेल्या नागपुरातील एका तरुणीस जम्मू-काश्मीर येथील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून फसविले. तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच मारहाण केली. या प्रकरणी पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी जम्मूला जाऊन आरोपीस अटक केली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतलेल्या विशेष पुढाकारामुळे हे शक्य झाले.
नागपुरातील २४ वर्षाची एक मुलगी पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करीत हाेती. तिची एका जम्मू-काश्मीरमधील कतरा जिल्ह्यातील एका मुलाबरोबर ‘वूई चॅट’या ॲपवर ओळख झाली. या मुलाने तिच्याशी मैत्री करून तिला फसवून तिच्यावर २०१७ ते २०२० या कालावधीत विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून कतरा येथे बोलावून बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिला मारहाण केली. तिचे अश्लील फोटो काढून ते फेसबुकवर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत मुलीने पुण्यातील सहकारनगर पाोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याचसोबत पीडित मुलीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही तक्रार केली होती. उपसभापती गोऱ्हे यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना १० ऑक्टोबर रोजी पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले हाेते. तसेच संबंधित पाेलीस निरीक्षकांना लेखी सूचनाही दिल्या होत्या. स्वत: गृहमंत्र्यांशी चर्चा केली. लॉकडाऊन असल्याने सर्व वाहतूक बंद होती. आरोपी जम्मूमधील आापल्या गावी होता. तरीही पुण्याचे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सहकारनगर पाोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलीस अधिकाऱ्यांनी जम्मू येथील कतरा शहरात जाऊन ८ नोव्हेंबर राेजी आरोपीस अटक केली व पुण्यात आणले. १४ नोव्हेंबर रोजी आरोपीस न्यायालयापुढे हजर केले असता ९ दिवसांची पाोलीस कोठडी मिळाली.
चांगला सरकारी वकील मिळण्यासाठी प्रयत्न करणार
या पीडित मुलीला चांगला सहकारी वकील मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात शेलार गुरुजी, विभावरी कांबळे या स्त्री आधार केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस व पीडित महिला यामध्ये समन्वय साधला. यामुळे पोलिसांना आरोपी पकडणे शक्य झाले.
नीलम गोऱ्हे
उपसभापती, विधान परिषद