नागपूर - इन्टर्न लेडी डॉक्टरच्या हत्येचा प्रयत्न करून तीन दिवसांपूर्वी नागपुरातून पळून गेलेला आरोपी विक्की राधेशाम चकोले (वय २८, रा. वलनी, सावनेर) याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकाजवळ मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून पिस्तुलाचे मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पुण्याला पळून गेल्यानंतर तो पुन्हा हत्येच्या हेतूने नागपुरात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.
आरोपी विक्कीचे या तरुणीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते लग्नही करणार होते. मात्र, दिरंगाई झाली अन् नंतर ती दुसरीकडे कनेक्ट झाल्याने विक्कीला टाळू लागल्याचा त्याचा आरोप आहे. तिच्यासाठी काहीही करायला तयार असल्याने तिच्या दगाबाजीने विक्की चिडला होता. त्यामुळे २२ नोव्हेंबरला तो तिला भेटण्यासाठी मेडिकलमध्ये गेला. तिने त्याच्याशी संबंध तोडल्याचे स्पष्ट केल्याने त्याने पिस्तुलातून तिच्यावर तीन वेळा फायर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुल लॉक झाल्याने मॅगझिन बाहेर आले. जिवाच्या धाकाने तरुणीने आरडाओरड केली अन् तिचे सहकारी धावून आल्याने विक्की पळून गेला. तो बैद्यनाथ चाैकातून ट्रॅव्हल्सने पुण्याला पळून गेला. तेथे एका मित्राच्या रूमवर तो पोहोचला. मात्र, त्याच्या गुन्ह्याची माहिती प्रसारमाध्यमांतून कळल्याने मित्राने त्याला तेथून हाकलून लावले. त्यामुळे तो तेथून ट्रकने पुन्हा नागपूरकडे परतला. बुधवारी रात्री वाडीत उतरल्यानंतर ऑटोने मेडिकल चाैकात आला. मेडिकल परिसरात त्याने पहाटेपर्यंत इकडून तिकडे चकरा मारल्या. ती दिसल्यास तिची हत्या करायची, असे त्याने ठरविले होते. मात्र, ती दिसली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रात्रभर वेड्यासारखा फिरला अन् फोन करून फसला
आरोपी विक्की रात्रभर वेड्यासारखा पायी फिरत होता. दरम्यान, त्याने एका झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयचा मोबाईल घेऊन एका मित्राला फोन केला. ही माहिती कळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर चाैरसिया, झाडोकर, ठाकूर, नायक रवी अहिर, प्रवीण रोडे, गुड्डू ठाकूर, कुणाल मसराम, सागर ठाकरे, सुधीर, इंगोले यांनी विक्कीचा माग काढून गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास रेल्वे स्थानकासमोरच्या जनता भोजनालयासमोर विक्कीच्या मुसक्या बांधल्या. त्याची तपासणी केली असता मॅगझिन आणि जिवंत काडतूस आढळले. पळून जाताना पिस्तूल मेडिकल परिसरातच फेकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
फिल्म सिटीत करोडपतीच्या सेटवर करीत होता काम
विकी मुंबईत फिल्मसिटीत ‘कोन बनेगा करोडपती’च्या सेटवर फायरमॅन म्हणून १५ हजार रुपये महिन्याची नोकरी करीत होता. त्याचे हिच्यावर खूप प्रेम होते. मात्र, ती आता झिडकारत असल्याने तिचे दुसरीकडे सूत जुळल्याचा संशय तो घेत होता. त्याचमुळे २२ नोव्हेंबरला त्याने तिच्या हत्येचा प्रयत्न केला. यानंतर तो कमालीचा डिस्टर्ब झाला होता. त्याचमुळे तिची हत्या करण्याच्या उद्देशाने विक्की पुन्हा नागपुरात परतला होता. फिल्मसिटीत काम करताना बिहारच्या एका फर्निचरवाल्याशी ओळख झाली. त्याच्याकडूनच पिस्तूल आणि काडतूस ४० हजारांत विकत घेतले होते, असे विक्कीने पोलिसांना सांगितले आहे.
आत्महत्येचीही केली होती तयारी
नैराश्याने घेरल्यामुळे विक्कीने आत्महत्येचीही तयारी केली होती. त्यालाअटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्या पर्समध्ये सुसाईड नोट आढळली. त्यात त्याने प्रेयसीच्या दगाबाजीमुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवल्याची माहिती आहे. रेल्वेसमोर उडी घेणार होतो, त्याचसाठी रेल्वेस्थानकाकडे आलो होतो, असेही त्याने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितल्याचे समजते. प्रेमभंग झाल्यामुळे विक्कीने यापूर्वीही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.
----