लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - यशोधरानगरातील एका पतसंस्थेचे शटर तोडून पावणेपाच लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या दोन भामट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले. दादू ऊर्फ प्रदीप देवधर ठाकूर (वय २०) आणि अजय ईश्वर बंजारे (वय १८) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही कळमना परिसरात राहतात.
मागासवर्गीय सहकारी पत संस्था यशोधरानगर या पतसंस्थेचे शटर १९ जूनला सायंकाळी बंद करून कर्मचारी निघून गेले. २० जूनला शटरचे कुलूप तुटून होते आणि आतमधील ४ लाख, ७९ हजारांची रोकड तसेच सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे श्रीदेवा आनंद येरणे यांनी यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले. त्याची गुन्हे शाखा युनिट पाचलाही माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहायक निरीक्षक नीलेश गोस्वामी, नायक श्रीकांत साबळे, पंकज लांडे, सचिन आंधळे, हिमांशू ठाकूर आणि प्रफुल्ल पारधी यांनी आरोपी दादू ऊर्फ प्रदीप देवधर ठाकूर (वय २०) आणि अजय ईश्वर बंजारे (वय १८) यांच्या गुरुवारी रात्री मुसक्या बांधल्या. त्यांना बोलते केले असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी एक लाख, ३० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईलसह २ लाख, १ हजारांचा ऐवज जप्त केला.
---
आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी ठाकूर आणि बंजारे हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे केले असून, हुडकेश्वर पोलिसांनी यापूर्वी त्यांना वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.
---