नागपूर : देशी दारूच्या २० पेट्यात असलेला मुद्देमाल गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन आरोपीकडून एकूण १० लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेली दारू चंद्रपूरला नेत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवराम कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी गस्त घालत होते. यावेळी आरोपी नितीन भाऊराव खडसे (३५) रा. प्लॉट नं. १००, दुबेनगर, हुडकेश्वर हा देशी दारूची तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या ताब्यातील महिंद्रा एक्सयूव्ही ३०० गाडी क्रमांक एम.एच.४९, बी.बी-७६८६ मध्ये दारूच्या २० पेट्या आढळल्या. या पेट्यात दोन हजार देशी दारूच्या बॉटल्स होत्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ५२ हजार रुपये आहे. यासोबत पोलिसांनी महिंद्रा एक्सयूव्ही गाडी किंमत १० लाख, रोख १ हजार, मोबाईल १० हजार असा एकूण १० लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अटक केल्यानंतर आरोपीची चौकशी केली असता त्याने अमित मसंद रा. कोराडी रोड, प्रेमनगर, मानकापूर, राकेश यांच्या मदतीने देशी दारू विकत घेतली असून, ही दारू चंद्रपूरला पोहोचविणार होतो, अशी कबुली दिली. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार, निरीक्षक शिवराम कुमरे, सहायक पोलीस निरीक्षक विजय कसोधन, ओमप्रकाश सोनटक्के, बबन राऊत, दीपक चोले, सतीश ठाकरे यांनी पार पाडली.
...........