लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोहमार्ग पोलिसांनी २३ फेब्रुवारीला रेल्वेगाडी क्रमांक ०२१९० नागपूर-दुरांतो एक्स्प्रेसमधून मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या ४ आरोपींना अटक केली आहे.
आरोपींमध्ये अजीज मोहम्मद खुर्शिद मोहम्मद (३०), मोहम्मद आरिफ मोहम्मद आबीद (३०), मोहम्मद निसार शेख मेहबुब (३४) आणि मोहम्मद फिरोज पठान यांचा समावेश आहे. सर्व आरोपी मोमिनपुरा येथील रहिवासी आहेत. यातील मुख्य आरोपी शेख तौफिक उर्फ हिरा सोनु अद्यापही फरार आहे. लोहमार्ग पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून ३४ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हिंगणा येथील रहिवासी पीडब्ल्यूडी मधील अभियंता अमोल चिंतामन नासरे आणि विलास लॉरेन्स मार्टिन दुरांतो एक्स्प्रेसने नागपूरवरून मुंबईला जात होते. विलास एस ३ आणि नासरे बी ११ कोचमधून प्रवास करीत होते. त्यांचे मोबाईल आरोपींनी पळविले होते.
धावत्या गाडीतून फरार झाले आरोपी
रेल्वेगाडी लोहापुलाजवळ आऊटरकडील भागात हळु धावत होती. अमोल कोचच्या दारावर उभा राहून आपल्या कुटुंबियांशी व्हिडीओ कॉलवर बोलत होता. दरम्यान एक अज्ञात युवक धावत्या रेल्वेगाडीत दुसऱ्या दारातून चढला. त्याने अमोलच्या हातातून मोबाईल हिसकावून खाली उडी मारली. दरम्यान एस ३ कोचमध्ये खिडकीतून बाहेरूनच कोणीतरी विलासच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. विलासने आरोपीचा हात पकडला. परंतु जोर लाऊन आरोपी मोबाईल पळविण्यात यशस्वी झाला. दोन्ही प्रवाशांनी पुढील रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
४८ तासात पकडले आरोपी
प्राथमिक तपासात या घटनेत एखाद्या टोळीचा हात असल्याची माहिती मिळाली. लोहमार्ग पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले. ४८ तासाच्या आत आरिफ, निसार आणि फिरोज पठानला अटक करण्यात आली. तर चोरीचा मोबाईल खरेदी करणाऱ्या अजीजलाही अटक करण्यात आली. पकडलेल्या आरोपीपैकी निसार चोरी केलेले मोबाईल घेऊन आरिफ आणि फिरोजच्या मदतीने ते विकतो. चौकशीत हीरा या टोळीचा प्रमुख असल्याची माहिती मिळाली. यापुर्वीही लोहमार्ग पोलिसांनी मोमिनपुराला लागून असलेला रेल्वे परिसर आणि आऊटरवर चोरट्यांच्या टोळीवर कारवाई केली आहे. परंतु हिरा पुन्हा रेल्वेत चोऱ्या करण्यासाठी सक्रिय झाला असून लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कविकांत चौधरी, दिपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, विजय मसराम, अमित त्रिवेदी, विनोद खोब्रागडे, गिरीश राऊत, मंगेश तितरमारे, शैलेश उके, योगेश घुरडे, चंद्रशेखर मदनकर, प्रविण खवसे यांनी पार पाडली.