नागपूर : पार्किंगमधून दुचाकी चोरी करून ती विकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मेकॅनिकला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने मुद्देमालासह अटक करून सदर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० मार्चला सायंकाळी ६.३० वाजता यास्मीन कादीर खान (३३, विजयनगर, सुरज अपार्टमेंटजवळ, छावणी) यांनी त्यांची अॅक्टीव्हा (क्र. एम. एच. ३१, डी. पी. ६९३१) पार्किंगमध्ये उभी केली होती. अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी चोरी केल्यामुळे त्यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत सदर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदारांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी सलमान खान दिलावर खान पठान (२४, गोलबाजार, इमलीपूरा, मोठ्या मस्जीदजवळ, आष्टी जि. वर्धा) ह. मु. आयबीएम रोड मोठी मस्जिदसमोर, अहमद पटेल यांच्या घरी किरायाने राहतो. तो मेकॅनिक असून त्याचे मानकापूर चौक येथे गॅरेज आहे. तो काही दिवसांपासून चोरीचे वाहन वापरत असून ते वाहन विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे समजले. लगेच पोलिसांनी कारवाई केली असता त्यांना चोरी केलेले वाहन त्याच्या जवळ आढळले.
वाहनाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या ताब्यातून चोरी केलेले वाहन किंमत ६० हजार रुपये जप्त करण्यात आले. हे वाहन मंगळवारी कॉम्प्लेक्स बाहेरील पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्याला चोरी केलेल्या वाहनासह सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) मुम्मका सुदर्शन, सहायक पोलिस आयुक्त सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल शिरे, सहायक पोलिस निरीक्षक तुषार काळेल, गजानन चांभारे, हवालदार रामनरेश यादव, संतोषसिंग ठाकुर, शेषराव राऊत, नितेश इंगळे, किशोर ठाकरे, गजानन कुबडे, प्रविण चव्हान यांनी केली.