नागपूर : मोबाईल व्यापाऱ्याला एमडीच्या तस्करीमध्ये फसविण्याचा कट रचून ब्लॅकमेलिंग करणारे गुंड मागील काही दिवसांपासून शस्त्रांच्या तस्करीतही गुंतलेले असल्याची माहिती पोलिसांना लागली आहे.
या रॅकेटचा संबंध मादक पदार्थाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीशी असून या टोळीचा सदस्य हाती लागल्यावर बरीच काही माहिती पुढे येणार आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास आरंभला आहे.
५ डिसेंबरला क्वेटा कॉलनीतील मोबाईल शॉपीमध्ये एमडी ठेवून शॉपीचे संचालक हिमांशू ठुठेजा यांना तस्करीत गोवण्याचा प्रयत्न झाला होता. या दुकानात एमडी ठेवल्यावर काही वेळातच एनडीपीएस सेलचे कर्मचारी चौकशीसाठी पोहचले होते. मात्र दोन युवकांसोबत आलेल्या एका युवतीने संशयास्पद वस्तूची पुडी दुकानात फेकल्याचे हिमांशूला एका महिलेकडून हे कर्मचारी येण्यापूर्वीच कळले होते. त्यामुळे हिमांशूने ती पुडी दुकानाबाहेर फेकली होती. सीसीटीव्हीचे फुटेज अधिकाऱ्यांनी तपासल्यावर खरे प्रकरण पुढे आले. पोलिसांनी या प्रकरणात निकिता राहुल मेश्राम (लस्करीबाग), मनमीत सिंह हरविंदरसिंह तक्खर (गुरुनानकपुरा, पाचपावली) यांना अटक केली. या प्रकरणात अमरिंदरसिंह ऊर्फ बग्गा, सहकारी अन्नी, शैबी याच्यासह ७ ते ८ जण सहभागी आहेत. ३ नोव्हेंबरला प्रशांत सहारे, बग्गा, अशोक खट्टर तसेच गुरुप्रीतसिंह रेणू यांच्याविरुद्ध फसवणुकीचे प्रकरण पोलिसांनी दाखल केले होते.
या प्रकरणात आतापर्यंत कुख्यात बग्गाचा सासरा अशोक खट्टर याला अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी बग्गा-सहारे प्रकरण आर्थिक शाखेकडे तपासासाठी सोपविले होते. गुन्हा दाखल होताच यातील एकएक आरोपी पोलिसांच्या हाती लागत आहेत. एमडी प्रकरण म्हणजे याच प्रकरणाची एक साखळी आहे.
...
पूर्व नागपुरातील गुन्हेगार बंधू झाले सक्रिय
या प्रकरणाशी पूर्व नागपुरातील कुख्यात गुंड बंधू आणि उत्तर नागपुरातील एक गुन्हेगार जुळलेला आहे. या गुन्हेगार भावंडांविरोधात हत्या, अपहरण, हप्तावसुलीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते क्रिकेट सट्टेबाजीही करतात. बग्गाशी जुळलेल्या या गुंडांची पूर्व नागपुरात दहशत आहे. बग्गाच्या हॉटेलातून तो ही सूत्रे चालवितो. अलीकडच्या घटनेनंतर दोघेही भाऊ सक्रिय झाले आहेत. उत्तर नागपुरातील एका गुंडाचीही पाचपावली पोलिसात हत्येप्रकरणात नोंद झाली आहे. पोलिसांचा खबऱ्या बनून तो गुन्हेगारी कारवाया करतो. घटनेच्या वेळी तोसुद्धा ठुठेजा यांच्या मोबाईल शॉपीमध्ये आला होता.