लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजी विक्रीचे दुकान लावण्याच्या क्षुल्लक वादात गुन्हेगार अक्षय निर्मलेची हत्या करणाऱ्या आरोपींना स्वत:चा गेम होण्याचा धोका दिसून येत असल्याने त्यांनी अक्षयची हत्या केली. या प्रकरणात सदर पोलिसांच्या हाती लागलेल्या एका आरोपीने ही माहिती दिली.
मंगळवारी सायंकाळी सदर येथील मंगळवारी बाजारात मस्कासाथ येथील २३ वर्षीय अक्षय किशोर निर्मले याचा खून करण्यात आला. राजू मोहनलाल वर्मा (५२) रा. चिंतामणीनगर, त्याचा मुलगा साहील राजू वर्मा रा. प्रेमनगर झेंडा चौक, भाचा विक्की वर्मा, निखिल वर्मा आणि निखिलचा साळा अशी आरोपीची नावे आहेत. अक्षय त्याची होणारी पत्नी आणि भावासोबत मंगळवारी बाजारात भाजी विक्रीचे दुकान लावत होता. बाजारात भाजीचे दुकान लावणाऱ्या बंडू यांचा मृत्यू झाला. अक्षयने बंडूची जागा त्याच्या पत्नीकडून एका महिन्यापूर्वीच खरेदी केली होती. तिथेही तो दुकान लावण्याच्या तयारीत होता. परंतु आरोपींनी त्याला तिथे दुकान लावण्यास मनाई केली. परंतु अक्षयने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याने आरोपी संतापले. तेव्हापासून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. या वैमनस्यातूनच अक्षयचा खून करण्यात आला.
अक्षय हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार आदी गुन्हे दाखल आहेत. त्याने नाईक तलाव परिसरात कुख्यात गुंड पिंटू ठवकरची हत्या केली होती. पिंटूची नाईक तलाव परिसरात दहशत होती. त्याचा खून केल्याने अक्षयचाही दबदबा वाढला होता. अक्षयची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्याने तो आपला जीव घेईल, अशी भीती आरोपींना होती. त्यामुळेच राजू वर्माने मुलगा व भाच्याच्या मदतीने अक्षयची हत्या केली. सदर पोलिसांनी राजूला आज न्यायालयासमोर सादर करून १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेतले.