बलात्कार करणारे आरोपी शिक्षेलाच पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 08:19 PM2018-04-10T20:19:21+5:302018-04-10T20:19:36+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना शिक्षेसाठीच पात्र ठरवून त्यांची २० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना वर्धा येथील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना शिक्षेसाठीच पात्र ठरवून त्यांची २० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना वर्धा येथील आहे.
विनोद बाकू जाधव (२४) व सुनील राजू जाधव (२४) अशी आरोपींची नावे असून ते वडार झोपडपट्टी, आर्वी नाका, वर्धा येथील रहिवासी आहेत. पीडित मुलगी घटनेच्या वेळी १६ वर्षे वयाची होती. ती इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. २६ सप्टेंबर २०१४ रोजी पहाटे ५.१५ च्या सुमारास ती गोडे मैदानाजवळ फुले तोडायला गेली होती. दरम्यान, आरोपींनी मुलीला पकडून मैदानात नेले व ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने स्वत:ची सुटका करण्याचे प्रयत्न केले होते, पण ती अपयशी राहिली. तिने लगेच कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी गुप्त माहितीवरून आरोपींना अटक करून ८ नोव्हेंबर २०१४ रोजी ओळख परेड घेतली. त्यात मुलीने पंचांसमक्ष दोन्ही आरोपींना ओळखले.
सत्र न्यायालयाने आरोपींना २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून आरोपींचे अपील फेटाळून लावले. सरकारतर्फे अॅड. एम. जे. खान यांनी बाजू मांडली.