नागपूर : अमरावती येथील खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाला बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार मारणाऱ्या दोन आरोपींची आजन्म कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे घडली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती.
राजू ऊर्फ मुकेश पूनमचंद डांगरे (४८) व दीपक ऊर्फ गोलू आनंदा तायडे (४०) अशी आरोपींची नावे असून ते दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. १३ एप्रिल २०१६ रोजी मलकापूर सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना आजन्म कारावासासह विविध कालावधीच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. आरोपींच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव संजय चौगुले होते.
खोलापुरी पोलीस मागावर होते
दीपक व इतर आरोपींविरुद्ध खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. हे आरोपी फरार होते. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. दरम्यान, आरोपी मलकापूर येथे राहत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे ते जानेवारी-२०११ मध्ये संजय चौगुले व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मलकापूर येथे गेले होते.
दार तोडून केला गोळीबार
आरोपी राहत असलेल्या घराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांनी बंदुकीत गोळ्या टाकून हल्ल्याची तयारी केली. परिणामी, पोलिसांनी घराचे दार बाहेरून बंद करून सुरक्षेकरिता आजूबाजूला आडोसा घेतला. त्यानंतर आरोपी घराचे दार तोडून बाहेर आले व त्यांनी पोलिसांवर बेछुट गोळीबार केला. एक गोळी चौगुले यांच्या पोटात शिरली व ते मरण पावले. दरम्यान, सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पुढे त्यांना अटक करण्यात आली.