नागपूर : ‘या ऐतिहासिक नाटकाचा आशय आणि पात्र वर्तमानकाळाशी संबंध जुळत असेल तर तो केवळ योगायोग नव्हे सत्यता समजावी’ अशी घोषणा सुरुवातीलाच करत अभिनेते व दिग्दर्शक मनोज जोशी यांनी आचार्य चाणक्य यांच्या कुटनीती, राजनीतीवर आधारित ‘चाणक्य’ या नाटकाचे सादरीकरण केले. मद्यांध, स्वार्थी राज्यकर्त्यांच्या तावडीत अडकलेल्या आणि छोट्या छोट्या तुकड्यांत विखुरलेल्या भारतवर्षाला अखंड करण्याची गर्जना ते हतबल झालेल्या वंचित नेतृत्वाला भारताला चक्रवर्ती सम्राट बनविण्याची हा ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे हे नाटक होते. नाटकातील संवाद, दृश्य आणि सर्व समूहांना एकत्रित, संघटित करण्याच्या आचार्य चाणक्यांच्या कृतीचे दर्शन या नाटकातून प्रेक्षकांना झाले.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी मनोज जोशी दिग्दर्शित व अभिनित ‘चाणक्य’ या महानाट्याचे सादरीकरण झाले. नाटकाचा हा १७८० वा प्रयोग होता. तत्पूर्वी ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ या देशभक्तीपर गीतांनी महोत्सवाची सुरुवात झाली. श्याम देशपांडे यांच्या नेतृत्वातील गायकांनी विविध गीते सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन किशोल गलांडे यांनी केले. त्यानंतर ट्रान्सजेंडर कलाकारांचे कार्यक्रम सादर झाले.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योगपती सत्यनारायण नुवाल, माजी खासदार अजय संचेती, राजेंद्र पुरोहित, नागपूर सुधार प्रन्यासचे मनोज सूर्यवंशी, व्यावसायिक विलास काळे, किन्नर महामंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य राणी ढवळे उपस्थित होत्या. यावेळी अभिनेते मनोज जोशी यांचा तसेच ट्रान्सजेंडर कलाकारांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.
ट्रान्सजेंडर कलाकारांची शानदार प्रस्तुती
- सोमवारी मिशन विश्व ममत्व फाउंडेशनच्या ट्रान्सजेंडर कलाकारांनी अप्रतिम नृत्य सादर करून रसिकांना अचंबित केले. मुद्रा डान्स अकादमीमध्ये तयार झालेल्या १५ ट्रान्सजेंडर कलाकार यात सहभागी झाले होते. राजस्थानातील घुमर नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उत्तर प्रदेशातील मोहे रंग दो लाल, पंजाबचे भांगडा, गुजरातचे पिया रे पिया रे, महाराष्ट्राची लावणी अशा विविध गाण्यांवर या कलाकारांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचा शेवट विविधतेने नटलेल्या भारतमातेला वंदन करण्याकरिता ‘वंदे मातरम्’ या गीताने केला. श्रद्धा जोशी व जयश्री बारई यांच्या नेतृत्वातील या कलाकारांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा विश्वास यांनी सूत्रसंचालन केले.
..............