योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: आचार्य विद्यासागरजी महाराज हे आपल्या देशाचे मौलिक रत्न होते. त्यांच्या केवळ दर्शनानेच असंख्य लोकांच्या जीवनात स्थिरता यायची. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रमुनी होते. त्यांनी अध्यात्मापासून ते देशविकासापर्यंत विविध बाबींवर वेळोवेळी मार्गदर्शन करत पाथेय सादर केले होते. त्यांच्या शिकवणी व प्रेरणेच्या मार्गावर जगाने चालले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. प.पू.आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या समाधी महोत्सव श्रृंखलेत रविवारी चिटणीस पार्क येथे विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट तसेच सकल जैन समाजातर्फे हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमुहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, गेव्ह आवारी, विलास मुत्तेमवार, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास ठाकरे, आ.प्रवीण दटके, उन्नती फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियम सागर महाराज, सौम्य सागर महाराज, निष्पृह सागर महाराज, निश्चल सागर महाराज, निर्भीक सागर महाराज, निरागसागर महाराज, ओंकार सागर महाराज, संयम सागर महाराज उपस्थित होते. कठोर व्रताचरण करणारे विद्यासागरजी महाराज सर्वांचेच मार्गदर्शक होते. त्यांचे बोलणे तर्कसंगत असायचेच, याशिवाय त्यात आत्मियतेचा भावदेखील असायचा. त्यांच्याजवळ अर्धा तासदेखील कुणी बसले तर वर्षभर त्याचे मन स्थिर रहायचे. आपल्या देशाला इंडिया नको, भारत म्हणा हाच त्यांचा आग्रह असायचा.
स्व आधारित प्रणालीतूनच देशातील रोजगार वाढेल व देश विकसित होईल असे ते नेहमीच उपदेश करायचे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या समाधीमुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली. या प्रसंगी अध्यक्ष आनंद मौजिलाल, मंत्री आशीष पंचमलाल जैन, सतीश कोयलावाले, विनय अलादीन, सोनू जैन कोयलावाले, संतोष पेंढारी, सतीश पेंढारी, नितिन नखाते, संतोष ठेकेदार, अनिल जैन बीएसआर, प्रमोद जैन गुडलक, जय बड़कुर, मनीष जैन, जीतेन्द्र जैन, डॉ सुरेश मोदी, शीतल एमपीएसटी, सनत जैन वर्धावाले, अजय बड़कर, नितिन महाजन, मुकेश केवलवाले, अरविन्द जैन, माजी महापौर दयाशंकर तिवारी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, अर्चना डेहनकर, महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष नॅश अली, विहिंपचे अमोल ठाकरे, मनिष मेहता इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
आचार्य हे प्रत्यक्ष ईश्वराचेच रूप : दर्डा
आचार्य विद्यासागरजी महाराज हे आपण ज्यांची आराधना करतो असे केवळ संत नव्हते, तर ते प्रत्यक्ष ईश्वराचे मूर्त रूपच होते. आपण ईश्वराची केवळ कल्पना करतो. मात्र आचार्यांना भेटल्यावर ईश्वर नेमके असेच असतात हे लक्षात आले. १९९४ साली रामटेक येथे चातुर्मासादरम्यान त्यांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले होते. त्यानंतर त्यांच्याशी निरंतर संपर्क राहिला. त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन नेहमीच मिळाले. आचार्य आपल्यात नसले तरी ते प्रत्येकाच्या मनात नेहमीच राहतील. त्यांचे उपदेश जगण्याचा मार्ग सांगणारे आहेत, या शब्दांत डॉ.विजय दर्डा यांनी विनयांजली अर्पण केली.