नागपूर: दागिने बनवणाऱ्या एका ख्यातनाम कंपनीने काढलेल्या प्रॉमिस बँन्ड या मनगटी विशेष बांगडीसाठी अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या व आता समाजसेवेला वाहून घेतलेल्या लक्ष्मी अग्रवाल- सा यांची निवड केली आहे. आपण नेहमी दुसऱ्यांना प्रॉमिस करीत असतो मात्र आपण आपल्यासोबत प्रॉमिस क्वचितच करतो. प्रॉमिस बँन्डच्या माध्यमातून स्त्रियांनी स्वत:ला काही प्रॉमिसेस द्यावीत व ती पाळावीत असा आशय यातून अभिप्रेत असल्याचे लक्ष्मी यांनी म्हटले. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या.
प्रॉमिस बँन्ड ही एक मनगटी बेल्ट किंवा बांगडी आहे. तीत कागदाची एक लहानशी घडी ठेवता येईल अशी सोय करण्यात आली आहे. या कागदावर आपण स्वत:ला एक प्रॉमिस लिहून तो कागद या बांगडीत ठेवायचा आहे. जेणेकरून त्या प्रॉमिसची सतत आठवण आपल्याला राहील व त्यानुसार आपण वाटचाल करू शकू, असा त्यामागचा हेतू लक्ष्मी यांनी स्पष्ट केला. अॅसिड पिडित महिलांच्या पुनवर्सनासाठी काम करताना आपल्याला, स्त्रियांना सन्मानाहून समान वागणूक अधिक महत्त्वाची वाटते कारण समान वागणूक असेल तर सन्मान हा येतोच असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
आपण नेहमी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बोलतो. पण पुरुषांवरही अत्याचार होत असतात. आता वेळ आली आहे की स्त्रियांपेक्षा पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बोलले गेले पाहिजे असे त्यांचे मत आहे.
अत्याचारामागील क्रूर मानसिकतेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, क्रूरता ही मुले सर्वप्रथम घरातच पाहतात. कधी ती वडिलांच्या एखाद्या कृतीत त्यांना दिसते तर कधी आईच्या आक्रस्ताळेपणात. हीच क्रूरता मग त्यांच्या अबोध मनात घर करते आणि पुढे ते त्यानुसार कधीतरी वागतातही. त्यामुळे मुलांसोबत वागताबोलताना आईवडिलांनी फार जास्त काळजी घेतली पाहिजे असे लक्ष्मी यांचे म्हणणे आहे.दिल्लीच्या रहिवासी असलेल्या लक्ष्मी अग्रवाल- सा यांच्यावर सूड भावनेतून एका तरुणाने २००५ मध्ये अॅसिड फेकले होते. त्यात त्यांचा चेहरा व शरीराचा बराचसा भाग भाजून निघाला होता. त्या अपघातातून सावरल्यानंतर त्यांनी आपले सर्व जीवन अॅसिड पिडित व समाजसेवेकरिता वाहून घेतले आहे.