नागपूर : लहानपणापासून वर्दीवर कर्तव्य बजावणाऱ्या वडिलांना पाहताना त्या वर्दीचे प्रचंड आकर्षण तिच्या मनात बसले आणि आपणही अशीच वर्दी परिधान करून देशसेवा करायची भावना मनात पक्की झाली. वयासह हेच ध्येय अधिकच दृढ झाले. परंतू पाेलिस वर्दीचा माेह बाळगणाऱ्या या मुलीने आपल्या बुद्धीने व परिश्रमाने वायुसेनेचा युनिफार्म प्राप्त करीत आकाशाला गवसणी घातली.
ही मुलगी आहे शहर पाेलीस विभागातील सहायक पाेलीस अधिकारी संताेष खांडेकर यांची कन्या प्रियंका, जिच्या यशामुळे नागपूरकरांना अभिमानाचा क्षण दिला. दीड वर्षाचे कठाेर प्रशिक्षण घेऊन वायुसेनेत फ्लाइंड ऑफिसर म्हणून पद प्राप्त केले आहे. नुकतेच बंगळूरू येथे भारतीय वायुसेनेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये प्रियंका यांना हा बॅच मिळाला आहे. नव्या वर्षात जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात गुजरातमधील बडाेदा येथे वायुसेनेच्या स्टेशनवर रूजू हाेणार आहेत.
प्रियंका खांडेकर यांनी नागपूरच्या व्हीएनआयटीमधून २०१९ साली इलेक्ट्राॅनिक्समध्ये बी.टेक. पूर्ण केले. इंजिनीअरिंगनंतर लाखाे रुपयांच्या पॅकेजची नाेकरी कुठेही मिळाली असती पण प्रियंकाने ताे माेह साेडून युपीएससीची तयारी सुरू केली. युपीएससीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेत देशातून चाैथी रॅॅंक प्राप्त केली. सीडीएसअंतर्गत त्यांना भारतीय सेनेत लेफ्टनंट म्हणून बॅच मिळाले हाेते व एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी त्या रूजू झाल्या हाेत्या. दीड महिन्याचे प्रशिक्षण हाेतच असताना भारतीय वायुसेनेच्या अॅफकॅट परीक्षेचा निकाल लागला आणि यात प्रियंका यांची फ्लाइंग ऑफिसर वर्ग-१ मध्ये निवड झाली. त्यांनी आकाशात भरारी घेण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी जून २०२२ ते डिसेंबर २०२२ अशी सहा महिने भारतीय वायुसेना अकॅडमी हैद्राबाद येथे व त्यानंतर २०२३ च्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंत बंगळूरू येथे वायुसेनेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात वर्षभराचे खडतर असे शारीरिक, मानसिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. नुकतेच ८ डिसेंबरला झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये त्यांची नेमणूक बडाेदा येथे करण्यात आली. जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात त्या कर्तव्यावर रूजू हाेणार आहेत. मुलीचे हे यश शब्दांच्या पलिकडचे आहे, अशी भावना एसीपी संताेष खांडेकर यांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली.