नागपूर : शहरातील महत्वाकांक्षी जयस्तंभ वाहतूक विकास प्रकल्पांतर्गत बहुमजली पार्किंग प्लाझा बांधण्यासाठी संरक्षण विभाग, रेल्वे मंडळ व मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जमीन संपादित करून द्या, अशी मागणी महामेट्रोने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
पार्किंग प्लाझासाठी संरक्षण विभागाची खसरा क्रमांक २४०६, २४०७, २४०८ व २४२२, रेल्वे मंडळाची खसरा क्रमांक २४०५ तर, परिवहन महामंडळाची खसरा क्रमांक २४०४ ही जमीन संपादित करणे आवश्यक आहे. या इमारतीमध्ये १२ बस फलाट आणि ५०० कार, ५५० दुचाक्या व ६०० सायकलींकरिता पार्किंगची व्यवस्था विकसित केली जाणार आहे. तसेच, अलिकडेच पाडण्यात आलेल्या गणेश टेकडी उड्डानपुलाखालील व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याकरिता, ३५ पीडित व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली असता, महानगरपालिकेने वरील माहिती दिली. तसेच, याविषयी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर येत्या ६ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.
संबंधित प्रकल्प २३४ कोटी रुपयांचा असून त्यांतर्गत पार्किंग प्लाझासह रेल्वेस्थानक ते कस्तुरचंद पार्कपर्यंत वाय आकाराचा उड्डानपुल, लोहापुलाजवळ रेल्वे अंडर ब्रिज व मानस चौक ते जयस्तंभ चौकापर्यंत सहा पदरी सिमेंट रोड बांधणे प्रस्तावित होते. दरम्यान, वाय आकाराचा उड्डानपुल व रेल्वे अंडर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. सहा पदरी सिमेंट रोडचे काम प्रगतीपथावर असून पार्किंग प्लाझाचा मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.