नागपूर विधानभवनासाठी लगतच्या जागेचे अधिग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 05:55 AM2022-09-23T05:55:04+5:302022-09-23T05:55:36+5:30
१९ डिसेंबरपासून शहरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील विधान भवन परिसर अधिक प्रशस्त होणार आहे. येथे नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. सध्याची जागा अपुरी असल्याने लगतची जागा अधिग्रहित करण्याची सूचना सरकारला करणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी येथे दिली. यासंदर्भातील दोन- तीन पर्यायांचा विचार सुरू आहे. मात्र निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
१९ डिसेंबरपासून शहरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले होते. नार्वेकर म्हणाले, अडीच वर्षांनंतर अधिवेशन होणार आहे. अधिवेशन किती दिवस चालले यापेक्षा किती कामकाज झाले हे महत्त्वाचे आहे. अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न राहील.
आमदार निवास आमदारांसाठी असावे
अधिवेशन काळातच आमदार निवासाचा वापर होतो. त्यामुळे इतर काळात त्याचा हॉटेल म्हणून वापर करण्याचा विचार असल्याबाबत विचारले असता आमदार निवास हे आमदारांसाठी असावे. इतर कामासाठी त्याचा वापर होता कामा नये, असे नार्वेकर म्हणाले.