कथित नक्षल कनेक्शनः प्राध्यापक साईबाबासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका; उच्च न्यायालयाचा निर्णय

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 5, 2024 11:03 AM2024-03-05T11:03:06+5:302024-03-05T12:10:48+5:30

दहशतवादी कारवायांचे बहुचर्चित प्रकरण; उच्च न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता.

acquittal of all accused including alleged Naxalite Gokarakonda Naga Saibaba; High Court decision of Nagpur Bench | कथित नक्षल कनेक्शनः प्राध्यापक साईबाबासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका; उच्च न्यायालयाचा निर्णय

कथित नक्षल कनेक्शनः प्राध्यापक साईबाबासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका; उच्च न्यायालयाचा निर्णय

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला. आरोपींविरुद्ध कारवाई करताना कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात आले नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

इतर आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर, विजय नान तिरकी व पांडू पोरा नरोटे यांचा समावेश आहे. नरोटे (रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली) याचे २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे निधन झाले आहे. साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही देहरादून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे.

गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी विजय तिरकीला १० वर्षे सश्रम कारावास तर, इतर सर्व आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली होती. तसेच, सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंड ठोठावला होता. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपीलवर गेल्यावर्षी ७ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला होता.

अशी झाली होती कारवाई


आरोपींविरुद्धच्या कारवाईला गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात झाली. गडचिरोली विशेष शाखेत कार्यरत तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड यांना महेश तिरकी व पांडू नरोटे हे सीपीआय (माओवादी) व आरडीएफ या प्रतिबंधित संघटनांचे सक्रीय सदस्य असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस या दोघांवर पाळत ठेवून होते. हे दोघे २२ ऑगस्ट २०१३ रोजी अहेरी बस स्थानक येथे भेटले. पोलिसांनी संशयास्पद हालचाली पाहून या दोघांसह हेम मिश्रालाही ताब्यात घेतले. पुढील चौकशीमध्ये साईबाबाने नक्षलवादी नर्मदाक्का हिच्यासाठी मिश्रामार्फत देशविरोधी कटाची माहिती पाठविली होती, ही बाब पुढे आली. त्यानंतर या कटात राही व विजय तिरकीदेखील सामील असल्याचे समजले. परिणामी, या सहाही आरोपींना गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती.

Web Title: acquittal of all accused including alleged Naxalite Gokarakonda Naga Saibaba; High Court decision of Nagpur Bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.