नागपूर : मानकापुरात राहणाऱ्या एका तरुणीचे जुणे फोटो वापरून कोणीतरी बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. व त्यावर तरुणीचे अश्लील फोटो आणि काहीबाही पोस्ट करून तिची बदनामी सुरू केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनीा माहिती मिळताच त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. सचिन यादव असे आरोपीचे नाव आहे.
सोशल मीडियाचे फॅड हे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक लहान-सहान गोष्टी आपण क्षणाक्षणाला पोस्ट करत असतो. मात्र, काही गुन्हे प्रवृत्तीचे लोक याचा फायदा घेत तुम्हाला अडचणीत पाडू शकतात. मानकापूर येथील तरुणीचे काही जुने फोटो वापरून फेसबूकवर टाकत तिची बदनामी करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. याबाबत तरुणीला समजले तेव्हा तिला धक्काच बसला मात्र, यामागे कोण आहे हे याची तिला माहिती नव्हती. तिने याप्रकरणी तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांनी याबाबत शोध घेतला असता आरोपी हा तरुणीचा जुना प्रियकर सचिन यादव असल्याचे समोर आले. याप्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटकेत घेतले.
प्रेमप्रकरणातून 'बदला'
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने हे कृत्य बदला घेण्यासाठी केल्याचे समोर आले. ब्रेक-अप झाल्याचा राग आरोपी कित्येक दिवसांपासून मनात ठेवून होता. तरुणीला अद्दल घडवून आपला बदला पूर्ण करण्यासाठी त्याने असे केल्याचे कबूल केले. सध्या तो पोलीस कस्टडीत आहे.
सोशल माध्यमं किती सेफ?
सोशल मीडियावर फसवणूकीच्या घटना दररोज आपण वाचत असतो. इंटरनेटच्या या जाळ्यात आपली माहिती ही कितपत सुरक्षित राहू शकते याबाबत प्रत्येकानेच सतर्क राहायला हवे. आजकाल सोशल माध्यमांवर नेहमी अपडेट राहण्याच्या नादात प्रत्येक गोष्टी पोस्ट करत असतो. सायबर चोर याच संधीची वाट बघत असतात आणि फायदा घेतात.
यापासून बचाव कसा करायचा...
गरज नसेल तर सोशल माध्यमांवर प्रत्येक गोष्टींचे अपडेट टाकण्याची सवय कमी करा. आपला फोन नंबर, इमेल आयडी, सोशल माध्यमांचे पासवर्ड आधार नंबर आदि गोष्टींची माहिती गरज नसताना शेअर करणं बंद करा, एका वेळेनंतर सोशल माध्यमांचे पासवर्ड बदलत राहणे गरजेचे आहे. गरज नसताना एखाद्या उपकरणावर कोणत्याही सोशल माध्यमांचे पासवर्ड ऑटोमॅटीक साइन करून ठेऊ नका. या काही बाबी तुम्हाला सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यास मदतप्राय ठरू शकतात.