लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश काढले होते. परंतु, शनिवारी काही प्रतिष्ठाने उघडी होती. त्यांच्यावर महापालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. एकूण १४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. दिवसेंदिवस वाढती बाधितांची संख्या चिंताजनक असल्याने महापालिकेकडून काही नियमांचे बंधन घालण्यात येत आहे. याशिवाय, कोविड नियमावलीचे काटेकोर पालन मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याच श्रृंखलेत महापालिकेने शनिवारी आणि रविवारी शहरातील अत्यावश्यक सेवा सोडता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. याला नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. मात्र, काही प्रतिष्ठाने ही नियमबाह्यरीत्या सुरू होती. अशा सर्व प्रतिष्ठानांवर मनपा पथकाकडून कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त पथकाकडून शहरातील ८७ मंगल कार्यालये, लॉनची पाहणी करण्यात आली. महापालिकेच्या सर्व झोनमध्ये ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आज रविवारीदेखील पथकाची सर्वत्र नजर असणार आहे. त्यामुळे, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावीत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
कारवाई झालेली प्रतिष्ठाने
लक्ष्मीनगर झोनमधील सुबोध बेकरी, शाहू किराणा स्टोअर्स, धरमपेठ झोनमधील बेरर फायनान्स, तनिश्क ज्वेलरी, इक्विटी स्मॉल फायनान्स, एक्साईड लाइफ इन्शुरन्स, स्माॅल फायनान्स बँक लि., धंतोली झोनमधील ओम बार अॅन्ड रेस्टॉरेंट, ब्रम्हा बार अॅन्ड रेस्टॉरेन्ट मानेवाडा रोड, गांधीबाग झोनमधील मेट्रो इलेक्ट्रिकल्स खदान सीए रोड, आशीनगर झोनमधील आनंद कन्ट्री लिकर शॉप तथागत चौक, मंगळवारी झोनमधील परपल क्सेअर प्रा. लि. सदर, इंडिया बायलर कोराडी रोड, कन्ट्री लिकर शॉप गिट्टीखदान आदींवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.