नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढली असून फुकटे प्रवासीही रेल्वेतून प्रवास करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने धडक मोहीम सुरु केली आहे. बुधवारी कामठी रेल्वेस्थानकावर राबविलेल्या मोहिमेत एकूण १७३ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांमुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होतो. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे. अभियानात रेल्वे तिकीट तपासनीस, वाणिज्य निरीक्षक, आरपीएफ जवानांनी कामठी रेल्वेस्थानकाला घेराव घातला. एकही प्रवासी तपासणी शिवाय बाहेर पडणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. तसेच कामठी रेल्वेस्थानकावर थांबलेल्या ०४०८० गोंडवाना एक्स्प्रेस, ०२१०१ एलटीटी-हावडा स्पेशल, ०२२७९ आझादहिंद एक्स्प्रेस, ०२८०९ हावडा-मुंबई मेलमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १७३ प्रवाशांकडून ७५ हजार २२५ रुपये दंड वसूल करण्यात आला. विना तिकीट प्रवास करणाऱ्या १२१ प्रवाशांकडुन ५३ हजार ५४० रुपये दंड, रेल्वेत अस्वच्छता पसरविणाऱ्या तीन प्रवाशांकडुन १ हजार ८५ रुपये दंड, विना मास्क प्रवास करणाऱ्या ३६ प्रवाशांकडुन १८ हजार रुपये आणि धुम्रपान करणाऱ्या १३ प्रवाशांकडुन २ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
......................