नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी दोन लग्न समारंभाच्या ठिकाणासह २६ दुकाने-प्रतिष्ठानांवर कारवाई केली, तसेच २ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
सरकारने कोविड नियमांमध्ये काहीशी शिथिलता बहाल केली असली तरी, कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मनपाच्या एनडीएस पथक सातत्याने धाड टाकून कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत आहे. शुक्रवारीसुद्धा ही कारवाई करण्यात आली. आशीनगर झोनच्या चमूंनी व्हिनस क्रिटिकल केअर रुग्णालयाला ४०,००० रुपयांचा दंड ठोठावला. सामान्य कचऱ्यामध्ये जैविक कचरा टाकण्यासाठी हा दंड ठेठावण्यात आला. तसेच गांधीबाग झोन व सतरंजीपुरा झोनच्या चमूने दोन वेगवेगळया लग्न समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रत्येकी रुपये १०,००० चा दंड लावला. याशिवाय पथकाने ४३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.