लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन असूनही विनाकारण घराबाहेर पडून कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढविणाऱ्या ४०४७ रिकामटेकड्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. १३४७ वाहने ताब्यात घेतली आणि बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांसोबत वाद घालून ठिकठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर दिवसभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने शहरात सोमवारपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. प्रसारमाध्यमातून त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली होती. शिवाय अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण रस्त्यावर फिरू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. कारण नसताना रस्त्यावर किंवा बाजारात फिरताना आढळल्यास आणि पोलिसांसोबत मुजोरी केल्यास त्यांना दंड्याचा प्रसाद मिळू शकतो. वाद घातला तर पोलीस कोठडीत जाण्याची वेळ येऊ शकते, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे लाखो नागपूरकरांनी घरातच राहणे पसंत केले. मात्र, अनेक बेजबाबदार घराबाहेर पडून नुसतेच इकडेतिकडे फिरत होते. बेजबाबदार आणि रिकामटेकड्यांकडून तसे होणार हे अपेक्षितच असल्याने पोलिसांनीही कारवाईची तयारी ठेवली होती. त्यासाठी सकाळपासूनच पोलीस ॲक्शन मोडवर दिसत होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सकाळी व्हेरायटी चाैक गाठून आधी या भागातील आणि नंतर विविध भागातील बंदोबस्ताचा आढावा घेतला, तर शहरातील सर्व पोलीस उपायुक्तांनी आपापल्या भागातील बंदोबस्तावर स्वताच नजर ठेवून आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करवून घेतली. वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून बेजबाबदार वाहनचालकांकडून वाहने डिटेन, चालान तसेच नो मास्कची कारवाई धडाक्यात करवून घेतली.
सैराट अन् फटकेबाज
दुपारी २ नंतर अनेक भागातील पोलीस सावलीत बसल्याचे पाहून अनेक जण सैराट झाले. ते विनाकारण फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी नियंत्रण कक्ष तसेच वरिष्ठांना माहिती कळविली. त्यानंतर पोलीस पुन्हा ॲक्शन मोडवर आले. सैराट सुटलेल्या अनेकांवर पोलिसांनी फटकेबाजी करीत त्यांना दंड्याचा प्रसाद दिला. नाहक गर्दी करून धोका वाढविणाऱ्यांवर कलम १८८ अन्वये ४२ गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिला दिवस ऑलआऊटचा
लॉकडाऊनचा आजचा पहिलाच दिवस सर्व पोलिसांसाठी ऑलआऊटचा होता. पोलीस आयुक्तांपासून पोलीस कॉन्स्टेबल (सीपी टू पीसी) प्रत्येकजण रस्त्यावर कर्तव्य बजावताना दिसले. दुपारनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेतानाच आणखी काय करायला हवे, त्या संबंधाने अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच डीसीपी विनिता साहू यांच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.