नागपूर : आलिशान कारमधून फिरत शहरात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर अखेर नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांसह दहा विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. बहुतांश विद्यार्थी हे श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबातील आहेत. आलिशान कारमध्ये फिरत हे विद्यार्थी गोंधळ घालत होते.
१४ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या कारमधून घरातून निघाले. धरमपेठेत एका ठिकाणी जमून त्यांनी शहरातील रस्त्यांवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वाहनाच्या छतावर बसून त्यांनी आवाज करण्यास सुरुवात केली. एक ते दीड तास या विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू होता. यादरम्यान एकाने रिल बनवून इन्स्टाग्रामवर ‘अपलोड’ केली. मंगळवारी सकाळी एका दक्ष नागरिकाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी झोन दोनचे उपायुक्त राहुल मदने यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. क्लिपची तपासणी केल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी तीन वाहनांचा छडा लावला. वाहन ताब्यात घेऊन अंबाझरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी वाहनातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही पोलिस ठाण्यात बोलावले. विद्यार्थ्यांच्या कृत्याची माहिती नसल्याचा दावा पालकांनी केला. अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे हाही गुन्हा असल्याने गुन्हा नोंदविण्यात येत असल्याची माहिती पालकांना दिली. विद्यार्थ्यांनी असे कृत्य केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला.
‘रिल’मुळे समोर आला प्रकार
संबंधित विद्यार्थ्यांनी असा प्रकार अनेकदा केल्याचा पोलिसांना संशय आहे. इन्स्टाग्रामवर ‘रिल’ अपलोड झाल्याने हा प्रकार समोर आला. या मस्तवालपणामुळे विद्यार्थ्यांसोबत इतर नागरिकांचादेखील जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिस अधिकाऱ्याचा मुलगादेखील चर्चेत
या प्रकरणावरून शहर पोलिस अधिकाऱ्याचा मुलगाही चर्चेत आला आहे. इम्पोर्टेड बाईक किंवा आलिशान वाहनावर बसून तो क्लिपिंग बनवतो. त्याचे व्हिडिओ अनेक वेळा व्हायरल झाले आहेत. त्याची सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने क्लिपिंग बनविणे बंद केले आहे. मात्र, गोंधळ घालण्यात तो आघाडीवर असतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
येथे हुल्लडबाजी जास्त
शहरातील काही विशिष्ट भागांत कारमधून बाहेर निघत, कारबाहेर डोकावत किंवा दुचाकीवर हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: रात्री अकरा वाजेनंतर हा प्रकार जास्त दिसून येतो. यात प्रतापनगर, अभ्यंकरनगर, आयटी पार्क, धरमपेठ, बजाजनगर, वंजारीनगर, सदर, ऑरेंज स्ट्रीट, वर्धमान नगर, उमरेड मार्ग, मेडिकल चौक या भागात असे प्रकार अनेकदा दिसून येतात.