नागपूर : जिल्हा परिषदेत गाजलेल्या एफडी घोटाळ्याच्या चौकशीअंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. एका कर्मचाऱ्याला निलंबित केले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून २५ लाख रुपयांची वसुलीही करण्यात येणार आहे.
नानक कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून एफडीचा गैरप्रकार होत असल्याचा प्रकार लघु सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी उघडकीस आणला होता. असेच प्रकार बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातही झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी प्रकल्प संचालक विवेक इलमे यांच्या अध्यक्षतेत सात सदस्यांची चौकशी समिती गठित केली होती.
विवेक इलमे यांच्या समितीने गेल्या दोन वर्षातील २० लाखापेक्षा अधिकच्या कामाच्या २०२ फाईल तपासल्या. यात बांधकाम विभागाच्या ९३, लघु सिंचन विभागाच्या ५६, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या २८ तर आरोग्याच्या २ तर सर्व शिक्षा विभागाच्या २३ फाईल होत्या. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १२ कर्मचाऱ्यांना दोषी ठरविले.
- नुकसानीची वसुली कर्मचाऱ्यांकडून
एफडीची रक्कम कोट्यवधीच्या घरात आहे. याच्या व्याजापोटी जिल्हा परिषदेला जवळपास २९ कोटींची रक्कम मिळाली असती. जि.प.चे झालेले नुकसान हे या कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे. लघु सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांकडून १२ लाख ५९ हजार, बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांकडून १२ लाख ७५ हजार तर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडून ३ लाख ५० हजाराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. याप्रकरणी तिन्ही विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.