नागपूर : विशेष वाहन तपासणी मोहिमेत नागपूर शहर व ग्रामीण आरटीओने तीन दिवसांत तब्बल १९३ वाहनांवर कारवाई करीत ३८ वाहने ताब्यात घेतली. या मोहिमेने दोषी वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे आरटीओचे म्हणणे आहे.
पोलिस आयुक्त यांच्या निर्देशानुसार नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), नागपूर ग्रामीण आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शनिवारपासून विशेष वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या तीन दिवसांत शहर व पूर्व आरटीओ मिळून १४६ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील ३१ वाहने ताब्यात घेऊन कार्यालयात अटकावून ठेवण्यात आली. ही मोहीम प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक अर्चना घाणेगावकर, वीरसेन ढवळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक स्नेहल पराशर, व्यंकटेश सिंदम, सुजय भवरे, स्वप्निल अटेल आदींनी केली.
-फिटनेस नसलेल्या स्कूल व्हॅनमधून १६ विद्यार्थ्यांचा प्रवास
नागपूर ग्रामीण आरटीओने मागील दोन दिवसांत या मोहिमेंतर्गत ४७ वाहनांवर कारवाई करीत ७ वाहनांना ताब्यात घेतले. यातील १९ वाहने धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभी होती. कारवाईत स्कूल व्हॅनचाही समावेश होता. कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जात असलेल्या या व्हॅनला आरटीओ वायुवेग पथकाने थांबविले. कागदपत्रांची तपासणी केली असता १६ विद्यार्थी बसलेल्या या व्हॅनला फिटनेस प्रमाणपत्रच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड, अभिजित मांजरे व सहायक मोटार वाहन निरीक्षक पवन येवले यांनी केली.