- १ कोटी ७ लाख दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही नागपूर शहरात काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत प्लास्टिक पिशव्या उत्पादक व वापरणाऱ्यावर कारवाई केली जाते. परंतु तरीही चोरट्या मार्गाने याचा पुरवठा व विक्री सुरू आहे. शहरातील भाजीबाजारात भाजीविक्रेते प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करतात. काही दुकानातूननाही चोरट्या मार्गाने कॅरीबॅग दिल्या जातात..
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक निर्मूलनासंदर्भात २३ जून २०१८ पासून नागपूर शहरामध्ये कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण शहरात २०४८ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३१ टन ९१४ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आल्या. तसेच १ कोटी ६ लक्ष ९५ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. प्रतिबंधित प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत २३ जून २०१८ ते आजपर्यंत मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ४७ हजार ६०७ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे.
...
मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या उत्पादक व वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाते .कोरोना कालावधीत कारवाई जवळपास बंद होती. आता पुन्हा नव्या जोमाने कारवाई सुरू केली आहे. परवाच २७० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहे. यापुढेही धडक कारवाई सुरू राहील.
डॉ. प्रदीप दासरवार,उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन,मनपा