लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नायलॉन मांजावर आणि प्लास्टिक पतंगांवर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री होत आहे. यामुळे तीन जणांचे बळी गेले तर अनेक जण जखमी झाली. ही बाब लक्षात येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मनपाच्या दहाही झोनमधील उपद्रव शोध पथकाने गुरुवारी ठिकठिकाणी धाडी टाकल्या. नॉयलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगांची विक्री करणाऱ्या ५५ विक्रेत्यांवर कारवाई करून ५५ हजारांचा दंड वसूल केला. तसेच नॉयलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्या २५० व्यक्तींवर कारवाई केली. ४०४८ पतंग, १०७ चक्री जप्त करण्यात आल्या.
नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंग विक्रीला आळा बसावा यासाठी नागपूर महापालिकेच्या दहाही झोनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ४२४ दुकानांची उपद्रव शोध पथकाने तपासणी केली. यात नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंग विकणाऱ्या ५५ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
......
सर्वाधिक कारवाई आशीनगर झोनमध्ये
नॉयलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगविरोधात उघडलेल्या मोहिमेमध्ये गुरुवारी दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक ७० दुकाने आशीनगर झोनमध्ये तपासण्यात आली. यापैकी तब्बल २१ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. पतंगबाजांवरील कारवाईमध्ये मंगळवारी झोन अव्वल असून सर्वाधिक ३५ पतंगबाजांवर या झोनमध्ये कारवाई करण्यात आली.