लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर शहर, उमरेड, काटोल, सावनेर, हिंगणा, पारशिवनी परिसरात विविध ठिकाणी दारूबंदी कायद्यांतर्गत एकाच दिवशी ३३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्रभारी अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर व मिलिंद पटवर्धन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत उपरोक्त ठिकाणी एकाच वेळी कारवाई करून ८ हजार २६३ लिटर सडवा नाश करण्यात आला. तसेच हातभट्टी दारू २०८४ लिटर, देशीदारू १०० लिटर तसेच चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०४ डीएन ७९८० होंडा वेर्ना कार व एक दुचाकी एमएच ३१ सीजे ३८७६ इत्यादी जप्त करण्यात आली.याचबरोबर नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मिळून आलेल्या तीन मद्यपींना न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केला. या विशेष मोहिमेमध्ये भरारी पथकाचे निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे यांच्या पथकाने चारचाकी वाहनातून जाणारी १४४० लिटर मोहा दारू वाहनासह जप्त केली.