लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होळी आणि धुळवडीच्या बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे शहरात कोणतीही मोठी घटना घडली नाही. नागरिकांनी होळी आणि धुळवडीच्या सणाचा मनसोक्त आनंद घेतला. ड्रंक न ड्राईव्ह तसेच विविध कलमानुसार पोलिसांनी ३४९० जणांविरुद्ध कारवाई केली.होळी आणि धुळवडीच्या सणाच्या निमित्ताने गुन्हेगार, समाजकंटक सक्रिय होतात. त्यामुळे अनेक ठिकाणी अप्रिय घटना घडतात. रंग लावण्याच्या बहाण्याने विनयभंग, बलात्काराचे प्रयत्न असेही गुन्हे घडतात. यावेळी मात्र पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी असे अप्रिय प्रकार घडू नये म्हणून नियोजनपूर्वक बंदोबस्त केला होता. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली. शहरातील कुख्यात गुन्हेगार, छोटेमोठे गुन्हेगार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून काहींना आतमध्ये डांबण्यात आले तर काहींना ताब्यात घेऊन रात्री सोडण्यात आले. दारूच्या नशेत वाहन चालविणारे, वाहतुकीचे नियम मोडणारे, गोंधळ घालणारे, उपद्रव करणारे अशा सर्वांवर तातडीने कारवाई केली जात असल्याने मोठा गुन्हा घडला नाही. बंदोबस्तासाठी सीसीटीव्ही नेटवर्कचाही वापर करून घेण्यात आला. वाहनांसोबत पायी गस्त, सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून शहरातील मुख्य चौक आणि परिसरातील स्थितीवर लक्ष ठेवण्यात आल्याने कुठे गडबड दिसल्यास चारही बाजूने मोठा पोलीस ताफा तेथे पोहचत होता. गुन्ह्याची माहिती देणाऱ्या प्रत्येक कॉलची नियंत्रण कक्षातून तातडीने संबंधित ठाण्याच्या पोलिसांना माहिती दिली जात होती. त्यामुळे होळी आणि धुळवडीचा सण अत्यंत उत्साहात तेवढाच शांततेत पार पडला.कळमन्यात दारुड्यांचा गोंधळकळमन्यात दारूड्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांवर हात उगारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दारुडे आणि वाहतूक शाखेचे पोलीस यांच्यात धुळवडीच्या दिवशी भरदुपारी पारडीत फ्री स्टाईल झाली. पोलिसांनी अतिरिक्त मदत बोलवून पोलिसांवर हात उगारणाऱ्या दारुड्या वाहनचालकांना चांगलाच धडा शिकविला. त्यांची नावे मात्र शुक्रवारी रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकली नाहीत.कारवाईचे स्वरूप७४४ जणांवर ड्रंक न ड्राईव्ह कारवाई७७३ कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेतले४४२ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती३०० गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई१२३१ जणांविरुद्ध मोटरवाहन कायद्यानुसार कारवाई