लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षमतेपेक्षा अधिक मुलांना वाहनात बसवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी अभियान राबवित पहिल्याच दिवशी ६७१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी वाहन चालकविरुद्ध चालानची कारवाई केली तसेच त्यांना असे न करण्याची ताकीदही दिली.शाळेतील मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले जाते. त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. शाळा संचालक आणि वाहन चालकांना वेळोवेळी याबाबत आवश्यक दिशानिर्देशही देण्यात आले होते. यानंतरही क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवणे कमी झाले नाही. त्यामुळे बुधवारी वाहतूक पोलिसांनी स्कूल वाहनाविरुद्ध विशेष अभियान सुरू केले. या अभियानात शिक्षण संस्थांजवळ आणि रस्त्यांवर वाहनांना थांबवून तपासणी करण्यात आली. एखाद दुसरे वाहन सोडले तर बहुतांश स्कूल वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. अनेक वाहनांमध्ये तर क्षमतेपेक्षा दुप्पट मुलं बसवण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी चालकांविरुद्ध चालानची कारवाई केली.वाहतूक पोलिसांनी सकाळपासूनच मोर्चा सांभाळला. वाहन चालकांनासुद्धा या कारवाईची माहिती मिळाली. ते कारवाईपासून वाचण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करू लागले. परंतु वाहतूक पोलिसांनी शिक्षण संस्थांजवळ सुद्धा जाळे पसरविले होते. त्यामुळे दोषी वाहन चालक कारवाईपासून वाचू शकले नाही. या मोहिमेत आॅटो, व्हॅन आणि बस चालक सर्वाधिक प्रभावित झाले. वाहतूक पोलिसांनी सायंकाळपर्यंत ६७१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली.उशिरा पोहोचले विद्यार्थीकारवाईपासून वाचण्यासाठी अनेक वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. त्यानंतरही ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास वेळ लागला. काही विद्यार्थ्यांनी पालकांना फोन करून उशिरा पोहोचल्याची तक्रारही केली.सायकल रिक्षांकडे होते दुर्लक्षकाही ठिकाणी सायकल रिक्षाने सुद्धा मुलं शाळेत जातात. त्यात सुद्धा मुलांना कोंबले जाते. शहरातील अनेक भागात हे चित्र पाहायला मिळते. परंतु सायकल रिक्षाविरुद्ध कुठलीही कारवाई केली जात नाही. इतर वाहनांच्या तुलनेत सायकल रिक्षाचे अपघात कमी होतात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.पालकांना सहकार्य करण्याचे आवाहनही मोहीम यापुढेही सुरू राहील. वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक मुलांना वाहनात बसवून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. ज्यांच्याविरुद्ध चालानची कारवाई करण्यात आली त्यांच्यात बदल झाल्याचे आढळून न आल्यास येण्याऱ्या दिवसात कठोर कारवाई केली जाईल. वाहनचालकांशिवाय शिक्षण संस्थांवरही मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांनी स्वत: यादिशेने पुढाकार घ्यायला हवा. त्याचप्रकारे पालकांनीसुद्धा आपली जबाबदारी पार पाडीत ज्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मुलं असतील त्या वाहनात आपल्या मुलांना पाठवू नये. या अभियानात पालकांनी सहकार्य करावेउपायुक्त रवींद्र परदेशीवाहतूक पोलीस
नागपुरात ६७१ स्कूल वाहन चालकांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:32 PM
क्षमतेपेक्षा अधिक मुलांना वाहनात बसवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी अभियान राबवित पहिल्याच दिवशी ६७१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी वाहन चालकविरुद्ध चालानची कारवाई केली तसेच त्यांना असे न करण्याची ताकीदही दिली.
ठळक मुद्देक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी : वाहतूक पोलिसांचे विशेष अभियान