लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिबंधित अल्प्राझोलम (०.५ एमजी) औषधांची डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करणाऱ्या एका औषध दुकानदारावर अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडी) आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. कारवाईनंतर एफडीएने दुकान बंद केले. दुकानातून ३२० रुपयांच्या १० पॅकेट गोळ्या जप्त केल्या. या गोळ्यांचा उपयोग तरुण नशा करण्यासाठी करतात. डॉक्टरांच्या चिठ्ठीविना या गोळ्या विकता येत नाहीत. पण पोलिसांनी सापळा रचून एका व्यक्तीला दुकानात गोळ्या विकत घेण्यासाठी पाठविले. फार्मसिस्टने निर्धारित मूल्य ३२ रुपयांऐवजी ५० रुपये घेऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गोळ्यांची विक्री केली. याची माहिती पोलिसांनी एफडीएचे सहायक आयुक्त डॉ. पी.एम. बल्लाळ यांना दिली. त्यांनी औषध निरीक्षक नीरज बाहेकर यांच्यासमवेत दुकानावर धाड टाकली आणि दुकानाचे मालक राहुल राजकुमार कृपनानी (२७ वर्ष), जरीपटका यांची चौकशी केली. दुकानाची झडती घेतली असता दुकानात ३२० रुपये किमतीचे अल्प्राझोलम औषधांच्या गोळ्यांचे १० पॅकेट आढळून आले. अधिकाऱ्यांनी फार्मसी बंद केली. मालकावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.