नागपूर : आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पराभव दिसत आहे. त्यामुळे राजकीय सुडाच्या भावनेने आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे सांगितले.
ॲग्रोव्हीजन या कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता, विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई सुरु असल्याबाबत विचारले असता, केंद्रीय मंत्री राणे यांनी सांगितले की, कसली अटक, काय केले त्यांनी? असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी काहीही केलेले नाही. त्यांचा संबंधच नाही. सत्ताधारी पक्षाला येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत. ते कुठेही अज्ञातवासात गेलेले नाही. ते आमदार आहेत. त्यांना अज्ञातवासात जाण्याची गरज नाही. सरकारला जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. कुणालाही मारहाण करण्यात त्यांचा काहीही संबंध नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले. अशाप्रकारची कारवाई होत असल्याचे समजल्याने काेर्टात जावेच लागले, असेही ते म्हणाले.