लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत उच्च पदावर कार्यरत असलेल्या घरमालकाची फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध विशाखापट्टनम पोलिसांनी नागपुरात येऊन कारवाई केली. या महिलेला अटक करून विशाखापट्टनमला नेण्यात आले आणि बुधवारी तेथील कोर्टापुढे हजर करण्यात आले. सुनयना पुरुषोत्तम चांडक असे पोलिसांनी कारवाई केलेल्या महिलेचे नाव आहे.
संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या तक्रारदारांनी काही वर्षांपूर्वी देवनगरातील पुष्कर फ्लॉरेन्स या बहुमजली ईमारतीत आलिशान सदनिका खरेदी केली होती. सदिनका विकत घेताना त्यांनी बँकेचे कर्ज घेतल्याने कर्जाचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी ही सदनिका सुनयना चांडक यांना भाड्याने दिली होती. दरम्यान, सदनिका मालकाची येथून आंध्र प्रदेशात बदली झाली. त्यानंतर काही दिवस नियमित भाडे दिल्यानंतर या महिलेने घरमालकाला भाडे देण्यासाठी टाळाटाळ करणे सुरू केले. प्रारंभी या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो, असे चालले. नंतर मात्र महिनोमहिने भाडे थकविले जाऊ लागल्याने सदनिका मालकावर बँकेच्या कर्जाच्या हप्त्याच्या बोझा वाढला. परिणामी त्यांनी सुनयना चांडक यांना विनवण्या सुरू केल्या. त्या दाद देत नसल्याने सदनिका रिकामी करण्याची विनंती केली. मात्र, त्यालाही दाद मिळत नसल्याने सदनिका मालकाने न्यायासाठी कोर्टात धाव घेतली. त्यानुसार, विशाखापट्टनम कोर्टातून सुनयना यांना समन्स, वॉरंट पाठविण्यात आले. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळत नव्हता. समंस, वॉरंट पाठवूनही दाद मिळत नसल्याने तेथील विशेष न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुनयना चांडक यांच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केला. हा वॉरंट घेऊन विशाखापट्टनम पोलिसांचे पथक मंगळवारी नागपुरात पोहचले. त्यांनी एक पत्रवजा संदेश पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याही कार्यालयात दिला. त्यानुसार, आयुक्तांकडून लगेच धंतोली पोलिसांचे पथक मदतीला देण्यात आले आणि सुनयना चांडक यांच्यावर वॉरंट तामिल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर विशाखापट्टनम तसेच नागपूर पोलिसांचे पथक सुनयना यांना घेऊन विशाखापट्टनम येथे पोहचले. त्यांनी बुधवारी तेथील विशेष दंडाधिकाऱ्यांपुढे सुनयना यांना हजर केल्याचे समजते. पुढच्या घडामोडीची मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही.------
धनादेश बाउन्स झाल्यानंतर वाद चिघळलासंबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरभाडे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुनयना चांडक यांनी सदनिका मालकाला खात्यात रक्कम नसूनदेखिल धनादेश दिला. हा धनादेश बाउन्स झाल्यानंतर प्रकरण चिघळले अन् नंतर कोर्ट केस तसेच अटकनाट्य घडल्याचे समजते.