लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तहसील कार्यालय, पोलीस विभाग आणि नगर पालिकेने संयुक्तपणे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली. साेमवारी दिवसभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५० जणांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील श्री संत जगनाडे महाराज भिसी नाका चौक येथे ही कारवाई दिवसभर सुरू होती.
दरम्यान, ताेंडाला मास्क न लावता एसटी चालविणाऱ्या चालकावरही कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रमोद कदम, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, महेश तायडे, अनिल येवले, रवीकुमार कावळे, नायब तहसीलदार, तलाठी तसेच महसूल कर्मचारी उपस्थित होते. शहरात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई होत आहे, अशी बाब सर्वत्र पसरल्यानंतर असंख्य नागरिकांनी मास्क आणि तोंडावर रुमाल बांधून सावधगिरी बाळगली. ही मोहीम सातत्याने सुरूच राहणार असून, विनामास्क आणि नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध ठोस कारवाई होईल, असे स्पष्ट संकेत ठाणेदार यशवंत सोलसे यांनी दिले.