लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात सदर रोडने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांना पान-सिगारेट विकणाऱ्या महिलेविरुद्ध सदर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आरोपी महिलेला लिबर्टी चौकात ताब्यात घेतले. सदर ठाण्यात आणून तिच्याविरोधात कलम १८८, २६९ व २७० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
ही महिला दिसायला सुंदर आहे. ती नेहमीच रात्री १२ वाजतानंतर कधी एनआयटी चौक. लिबर्टी चौक, व्हीसीए चौक, माऊंट रोड तर कधी स्मृती टॉकिज समोर दुचाकी घेऊन उभी असते. प्रत्येक वाहनचालकास थांबवून पान, सिगारेट, गुटखा आदी हवे का म्हणून विचारणा करते. काही लोक रात्री उशिरा एक महिला अशाप्रकारे थांबवत असल्याने घाबरून निघून जातात. तर जे तिला ओळखतात ते मनमानी भावाने पान. सिगारेट खरेदी करतात. काही आंबटशौकीन तरुणांचे घोळके तर तिला शाेधत दररोजच सदर रोडवर फिरत असतात. तरुणांचे घोळके तिच्या आजूबाजूला सिगारेटचा धूर उडवत नेहमी दिसून येतात. पोलिसांचे गस्तीचे वाहन पाहताच ते गायब होतात. ती महिलाही निघून जाते.
सदरचे ठाणेदार संतोष बकाल यांनी कोविड काळात रात्री उशिरा रस्त्यांवर फिरून साहित्य विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध विविध कलमाखाली कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे.