प्रभारी कुलसचिवांनी घेतली गंभीर दखल : कुलगुरूंसोबत चर्चा करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील निरनिराळ्या विभागांमधील कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात हे ‘लोकमत’ने छायाचित्रांसह प्रकाशित केल्यावर प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. सद्यस्थितीत कुलगुरू, कुलसचिव हे बाहेरगावी असले तरी प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कर्मचाऱ्यांवर वचक आवश्यकच आहे व याबाबत कुलगुरूंसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठात अनेक विभागांतील कर्मचारी व अधिकारी वेळेत पोहोचतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र प्रतीक्षा करावी लागते. ‘लोकमत’ने ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर रविवारी सुटी असूनदेखील कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये त्याचीच चर्चा होती. नियमितपणे विद्यापीठाच्या वेळांचे पालन करणाऱ्यांनी या पुढाकाराचे स्वागतदेखील केले. यासंदर्भात डॉ. खटी यांना विचारणा केली असता नियमितता पाळणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्यच आहे. जर त्यात कसूर होत असेल आणि कर्मचारी जाणूनबुजून उशिरा येत असतील तर त्यांच्यावर वचक आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरु तसेच कुलसचिव परतल्यानंतर त्यांच्याशी यासंदर्भात चर्चादेखील करू, असे आश्वासन त्यांनी दिले. परीक्षा विभागातदेखील ‘बायोमेट्रिक’ प्रणाली खराब होती. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी चर्चा केल्यानंतर येथे ‘मशीन्स’ बसविण्यात आल्या. त्यामुळे बहुतांश कर्मचारी आता वेळेवर येत आहेत. जर कर्मचारी वेळेवर आले तर कारभारदेखील सुरळीतपणे चालतो, असे ते म्हणाले.
लेटलतिफांवर होणार का कारवाई ?
By admin | Published: May 08, 2017 2:29 AM