नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वेच्या रुळाजवळ गुरे चारली जात असल्याने अनेक ट्रॅकवर गुरांचे अपघात होताहेत. गावागावांतील गुरांच्या मालकांना वारंवार सूचना, आवाहन करूनही ते प्रतिसाद देत नसल्याने आता त्यांच्याविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शहरे आणि गावांच्या बाजूने रेल्वेची लाइन गेलेली आहे. गावातील अनेक गुरांचे मालक रेल्वे रुळाच्या बाजूला आणून आपली जनावरे चारतात. चारणाऱ्यांचे दुर्लक्ष होताच गुरे रेल्वे रुळावर येतात. त्याचवेळी एखादी रेल्वेगाडी आल्यास अपघात होतो आणि त्या जनावराचा जीव जातो. अपघात झाल्यानंतर रेल्वेगाडी थांबते. नंतर ते जनावर बाजूला केले जाते आणि नंतर गाडी पुढे निघते.
अपघातामुळे रेल्वेच्या वेळेपत्रकावर परिणाम होतो. ती गाडी विलंबाने पोहोचते अन् त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गाडी येत असताना रेल्वे रुळावर जनावरे धावतात. त्यामुळे मोठ्या अपघाताचाही धोका निर्माण होत असतो. वेगवेगळ्या भागात वारंवार जनावरांचे अपघात होत असल्याने रेल्वेने वेळोवेळी विविध ठिकाणच्या गावकऱ्यांना रेल्वे रुळाजवळ गुरे नेऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे जनावराचा जीव जातो आणि तुमचेही नुकसान होते. रेल्वेचे नेटवर्कही विस्कळीत होते, असे समजावून सांगितले आहे. मुक्या जनावरांना कळत नाही त्यामुळे ते रेल्वेच्या ट्रॅकवर जातात. मात्र, तुम्हाला कळते, तुम्ही हे अपघात रोखण्यास मदत करा, असे आवाहनही केले आहे. जनजागरण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तसेच ऑपरेटिंग विभागातील कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून त्यांच्याकडून वारंवार ज्या भागात जनावरांचे अपघात होतात, ते ठिकाण अधोरेखीत केली आहेत. नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी पत्रके आणि बॅनरही लावले आहेत. मात्र, अनेक ठिकाणच्या जनावरांच्या मालकांकडून त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने गुरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, यापुढे ज्या गावाशेजारी, रेल्वे ट्रॅकवर जनावरांचा रेल्वेने अपघात झाला. त्या जनावराच्या मालकावर रेल्वे कायद्याच्या कलम १५४ नुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
आवाहन आणि इशारा
जनावरांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या मालकांनी त्यांची जनावरे रेल्वे रुळाच्या बाजूला चारण्यासाठी आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी रुळांच्या बाजूला जनावरे चारली जात असताना दिसल्यास त्या जनावरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.