नागपूर: रेल्वेगाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईचे विशेष अभियान चालविले जात आहे. त्यानुसार, विशेष तपासणी करून रेल्वेगाड्यांमध्ये ज्वलनशिल पदार्थ नेणाऱ्यांना हुडकून काढले जात असून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे.
नवी दिल्ली-दरभंगा एक्प्रेसमध्ये बुधवारी आगीची घटना घडली. यापूर्वीही विविध रेल्वेगाड्यांमध्ये अशा घटना घडून अनेकांना नुकसान झाले आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने यापुढे रेल्वे गाड्यांमध्ये आगीच्या घटना घडू नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या नेतृत्वात आरपीएफने विशेष तपासणी मोहिम गुरुवारपासून सुरू केले आहे. एक आठवडा हे विशेष तपासणी मोहिम सुरू राहणार आहे. सध्या छटपूजेसाठी वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमधून बिहार आणि उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या गाड्यांवर नजर रोखण्यात आली आहे. प्रवाशांकडे असलेल्या बॅग, पिशव्या, पोती (बोरी) यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वानांकडून विशेष तपासणी केली जात आहे.
रेल्वे स्थानकावरूल बॅग स्कॅनरच्या माध्यमातूनही तपासणी केली जात असून पब्लिक अनाऊंसमेंट (पीए) सिस्टममधूनही प्रवाशांना सूचना दिल्या जात आहे. गॅस सिलेंडर, विस्फोटक पदार्थ, पटाखे, पेंट, पेट्रोलियम पदार्थ, दारू, गन पाउडर, रसायण तसेच कोणतेही ज्वलनशील पदार्थ अथवा साहित्य सोबत नेण्यास प्रवाशांना मनाई केली जात आहे. स्वत:सह ईतरांच्या जानमालाला धोका निर्माण करू नका, असे आवाहनही केले जात आहे.
१५ व्यक्तींना अटकसूचना, माहिती देऊनही लपून छपून वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमधून फटाके, गॅस सिलिंडर सारखे ज्वलनशिल चिजवस्तू नेणाऱ्या १५ जणांविरुद्ध आरपीएफने कारवाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध रेल्वे सुरक्षा कायद्याच्या कलम १६४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.