लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील अतिक्रमण हटवून अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी तुळशीराम काेठेकर, चंद्रशेखर भाेयर व रामानंद अडामे या माजी नगरसेवकांनी १२ ऑगस्टपासून रामटेक शहरातील महात्मा गांधी चाैकात आमरण उपाेषणाला सुरुवात केली हाेती. अतिक्रमणधारकांवर आठ दिवसात फाैजदारी कारवाई करण्याचे आश्वासन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिल्याने आंदाेलकांनी रविवारी (दि. २२) उपाेषण साेडले.
काहींनी रामटेक नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. यात परमानंद मठ देवस्थान लगतच्या जागेचा समावेश असून, त्या जागेवर भूखंड तयार करून त्यांची विक्री करण्यात आली आहे. नवरगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आमगाव येथे तसेच साेनेघाट ग्रामपंचायतने रामटेक नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. हे सर्व अतिक्रमण हटविण्यात यावे. शहरातील ७२ घरकुलांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे, घरकुलातील अवैध धंदे बंद करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी तिन्ही माजी नगरसेवकांनी शहरातील महात्मा गांधी चाैकात १२ ऑगस्टपासून आमरण उपाेषणाला सुरुवात केली हाेती.
तहसीलदार बाळासाहेब मस्के व पालिकेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी उपाेषणकर्त्यांशी चर्चा करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले हाेते. पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी विमला आर. यांना या प्रकरणाची चाैकशी करण्याच्या सूचना केल्या हाेत्या. आंदाेलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यातच हर्षल गायकवाड यांनी अतिक्रमणधारकांविरुद्ध पाेलिसात तक्रार दाखल केली. मात्र, कुणावरही गुन्हे दाखल करण्यात आले नाही.
दरम्यान, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी रविवारी आंदाेलकांची भेट घेत चर्चा केली व अतिक्रमणधारकांवर आठ दिवसात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येणार असल्याची ग्वाही दिल्याने आंदाेलकांनी त्यांच्या हाताने लिंबू सरबत पिऊन उपाेषण साेडले. यावेळी चंद्रपाल चाैकसे, हुकूमचंद आमधरे यांच्यासह काँग्रेसचे नेते व अधिकारी उपस्थित हाेते.