लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार इमारत बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुराची नोंदणी करणे अनिवार्य असून, त्यासाठी कामगारांचे विशेष नोंदणी अभियान येत्या १५ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. बांधकाम करताना आधी मजुरांची नोंदणी करून नंतरच कामे सुरू करावीत, अन्यथा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि शासनाच्या कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे सोमवारी या एकाच विषयावर दोन बैठकी घेण्यात आल्यात. या बैठकीला कामगार मंडळाचे सदस्य अशोक भुताड, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, शिक्षण सभापती उकेश चव्हाण उपस्थित होते.बांधकाम कामगार म्हणून २२ प्रकारची कामे शासनाने ठरवून दिली आहते. ती कामे करणाऱ्या कामगाराची बांधकाम मजूर म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या १९ सुविधा द्याव्या लागणार असून, कंत्राटदारांनी या सुविधा कामगारांना द्यायच्या आहेत. जिल्ह्यात सुमारे ४० हजार कामगारांची नोंद अपेक्षित आहे. कामगाराने वर्षातून ९० दिवस काम केले असेल अशा कामगाराला संबंधित कंत्राटदाराचे किंवा शासकीय संस्थेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागणार आहे.सर्व कामगारांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. शासनाच्या या योजनेत नोंदणी केल्याशिवाय संबंधित कामगाराला बांधकाम क्षेत्रात काम करता येणार नाही, नोंदणी न झाल्यास संबंधित बांधकामाच्या कंत्राटदारास जबाबदार धरण्यात येणार आहे. यासाठी कामगारांच्या नोंदणीची शिबिरे घेण्यात येणार आहेत. महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, ग्रामपंचायतींमध्ये कामगारांना नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्याप्रमाणपत्रासाठ़ी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंत्राटदारांनी व शासकीय संस्थांनी शिबिरे लावून कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.सुरेश भट सभागृहात उद्घाटनबांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानाचे उद्घाटन राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस ज्या दिवशी करतील, त्याच दिवशी नागपुरातही कविवर्य सुरेश भट सभागृहात नोंदणी अभियानाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे.
बांधकाम मजुराची नोंदणी न केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 9:55 PM
बांधकाम करताना आधी मजुरांची नोंदणी करून नंतरच कामे सुरू करावीत, अन्यथा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि शासनाच्या कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
ठळक मुद्देकंत्राटदार व कार्यकारी अभियंत्यास धरणार जबाबदार