मनपा आयुक्त श्याम वर्धने : १९ हजार ५२० व्यापाऱ्यांचे रिटर्न जमा नागपूर : एलबीटी रिटर्न फॉर्म जमा करण्यास व्यापाऱ्यांनी पाठ दाखविली आहे. आज गुरुवारला शेवटच्या दिवशी फक्त २१२० व्यापाऱ्यांनीच फॉर्म जमा केले. रिटर्न जमा करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितले. मनपात ४० हजार ३०० व्यापारी एलबीटीअंतर्गत नोंदणीकृत आहेत. त्यापैकी आतापर्यंत १९ हजार ५२० व्यापाऱ्यांनी वार्षिक एलबीटी रिटर्न जमा केले. पाच लाखापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना रिटर्न फॉर्म जमा करणे बंधनकारक आहे. एलबीटी कायद्याप्रमाणे ३० जूनपर्यंत रिटर्न जमा करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री यांनी एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत रिटर्न जमा करायचा आहे. आज शेवटच्या दिवशी २१२० व्यापाऱ्यांनी एलबीटी रिटर्न फॉर्म जमा केले. तर आतापर्यंत १९ हजार ५०० व्यापाऱ्यांनी फॉर्म जमा केले. फॉर्म न जमा करणाऱ्यांवर कायद्यात पाच हजार रुपये दंड व दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. तसेच त्यांची नोंंदणी रद्द करण्यात येणार आहे. मुदतवाढ दिल्यावरही रिटर्न न जमा करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. आधी नोटीस देण्यात येणार असून, त्यावर संबंधित व्यापाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
रिटर्न न भरणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: August 01, 2014 1:11 AM