योगेश पांडेनागपूर : सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्सचालकांकडून बसभाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ करण्याचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. सिझनमध्ये दीडपट भाडेवाढीची मुभा आहे. त्याहून जास्त भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. प्रवासी तक्रार करण्यास समोर येत नसल्याने कारवाई होत नाही. त्यामुळे थेट परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.
सचिन अहिर यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघाताच्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडली होती. त्यावरील चर्चेत ते बोलत होते. नाशिक-औरंगाबाद मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, यापुढे चारचाकी वाहनांची प्रवासी नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
भरारी पथकांची क्षमता वाढविणार
- खासगी बसचा अपघात होऊन आगीत काही प्रवाशांचा मृत्यू होणे, ही बाब गंभीर आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून वाहन परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याबाबत कडक धोरण राबविणार असून, भरारी पथकांची क्षमता वाढविण्यात येईल.
- भरारी पथके अधिक कार्यक्षमतेने कार्यरत करणार असून, पथकांना लक्ष्यांक देऊन वाहने तपासण्याचे काम करणार आहे. यासाठी परिवहन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कडक देखरेख केली जाईल, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
वाहन योग्यता प्रमाणपत्राची सक्ती करणार महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागावी व अपघात कमी करण्यासाठी २४ तास विशेष तपासणी मोहीम चालू करणार आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. परिवहन मंडळाची साडेपाच हजार वाहने २ वर्षांत नवीन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.