महावितरण : मागेल त्याला कृषीपंप नागपूर : कृषीपंपाच्या ऊर्जीकरणासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांतून शासनाने विशेष योजनेंतर्गत नागपूर परिमंडलासाठी मुबलक निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याअनुषंगाने परिमंडलातील निवडक १६ उपविभागात एप्रिल २०१७ पासून ‘मागेल त्याला कृषीपंप’ जोडणी देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात मागणीपत्राचा भरण करूनही कृषीपंपाची जोडणी प्रलंबित असलेल्या यादीनुसार ज्या उपविभागात प्रलंबित जोडण्यांची संख्या अत्यल्प आहेत, अशा सर्व अर्जदारांना मार्च २०१७ अखेरपर्यंत वीज जोडण्या दिल्या जाणार आहे. शिवाय यानंतर एप्रिल २०१७ पासून ‘मागेल त्याला कृषीपंप’ जोडणी देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यासाठी काटोल, मोहपा, नरखेड, कोंढाळी, कामठी, कन्हान, नागपूर-१, कळमेश्वर, खापरखेडा, खापा, पारशिवनी, बुटीबोरी, हिंगणा, खरांगणा, वर्धा ग्रामीण-१ आणि वर्धा ग्रामीण-२ या उपविभागांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व प्रलंबित अर्जदारांना मार्च २०१७ अखेरपर्यंत वीजजोडण्या देण्याच्या सूचनाही सर्व संबंधित अभियंते आणि कंत्राटदारांना देण्यात आल्या आहे. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्यास त्याचीही परवानगी देण्यात आली आहे. शिवाय ‘कृती आराखडा’ तयार करून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि कंत्राटदाराच्या मदतीने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या नागपूर परिमंडलातील तब्बल ३४९१ शेतकऱ्यांना मागणीपत्र वितरित करण्यात आले आहे, यात नागपूर जिल्ह्यातील १६९९ आणि वर्धा जिल्ह्यातील १७८५ ग्राहकांचा समावेश आहे. या सर्व शेतकऱ्यांनी मार्च २०१७ पर्यंत मागणीपत्रात नमूद शुल्काचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. या ग्राहकांनी मार्चअखेर पर्यंत मागणीपत्रात दिलेल्या शुल्काचा भरणा केल्यास त्यांचे नाव २०१६-१७ च्या ज्येष्ठता यादीत येईल. शिवाय अशा सर्व ग्राहकांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया मार्च २०१८ पर्यंत पूर्ण केली जाईल. ३१ मार्च २०१७ नंतर शुल्काचा भरणा केलेल्यांच्या नावाचा समावेश २०१७-१८ च्या यादीत होणार आहे. तसेच त्यांना प्रत्यक्ष वीज जोडणीसाठी मार्च २०१८ पर्यंत वाट बघावी लागणार आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना महावितरणकडून मागणीपत्र मिळाले आहे, त्यांनी लगेच त्याचा भरणा करून महावितरणच्या संबंधित कार्यालयाकडे पैसे भरल्याच्या पावतीची नोंद करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. साधारणत: कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीसाठी प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत मागणीपत्रानुसार शुल्काचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाचा समावेश त्यापुढील आर्थिक वर्षाच्या यादीत केला जातो आणि त्यानंतरच येणाऱ्या मार्चपर्यंत त्या यादीतील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठीची नवीन वीज जोडणी दिल्या जाते. मात्र अनेकदा मागणीपत्रातील शुल्काचा वेळीच भरणा न केल्याने संबंधित शेतकऱ्याचे नाव पुढील आर्थिक वर्षाच्या ज्येष्ठता यादीत जाते आणि पर्यायाने त्यांना वीज जोडणी मिळण्यास विलंब होतो. (प्रतिनिधी)
कृषीपंपासाठी कृती आराखडा
By admin | Published: March 27, 2017 2:20 AM