३०० बाईकर्स अडचणीत : वाहतूक पोलिसांची कारवाईनागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हैदोस घालू पाहणाऱ्या बुलेट आणि बाईकर्सविरुद्ध शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून सुमारे ३०० दुचाकीचालकांवर कारवाई केली. या धडक कारवाईमुळे सुसाट वेगाने दुचाकी दौडत रस्त्यावर हैदोस घालू पाहणाऱ्या दुचाकीचालकांचे धाबे दणाणले होते.स्वातंत्र्यदिन, गणराज्यदिनाचे निमित्त साधून काही दुचाकीचालक रस्त्यावर हैदोस घालतात. टिबल, चौबल सीट बसून बेदरकारपणे वाहने दौडवितानाच आरोपी दुचाकीचालक मध्ये मध्ये बुलेट, मोटरसायकलमधून फटाका फुटावा तसा आवाजही करतात. रस्त्याने शांतपणे जाणाऱ्या वाहनचालकाच्या, पायी चालणाऱ्यांच्या जवळून जाऊन मोठ्याने ओरडतात, किंचाळतात. त्यामुळे अनेकांना अपघात होऊन जायबंदी व्हावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यंदा त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शहर पोलिसांना दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखाच नव्हे तर ठाण्यातील पोलिसही गणराज्यदिनाच्या सकाळपासून रस्त्या रस्त्यावर दुचाकीचालकांचा बंदोबस्त करताना दिसत होते. सायलेन्सर फुटल्यागत तसेच फटाके फोडण्याचा आवाज करणाऱ्या बुलेट गँगवर पोलिसांनी विशेष नजर रोखली होती. त्यानुसार सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५५ बुलेट चालकांसह २९० दुचाकीचालकांवर पोलिसांनी कारवाई झाली. या धडक कारवाईमुळे हैदोस घालू पाहणाऱ्या दुचाकीचालकांचे धाबे दणाणले. ते इकडे-तिकडे पळत असल्याचे चित्र दिसत होते.(प्रतिनिधी)सेमिनरी हिल्समध्ये प्रसाद सिव्हिल लाईन, सेमिनरी हिल्स परिसरात गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मोहीम राबविली. त्यांनी दुपारी २ वाजेपर्यंत २५ ते ३० फटाके फोडणाऱ्या भरधाव बुलेटचालकांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. भाईगिरी, नेतागिरी करणाऱ्या काही बुलेटचालकांना पोलिसांनी प्रसादही दिला. या कारवाईमुळे दुचाकीचालकांची चांगलीच धावपळ उडाली होती. लोकमतचे आवाहनकेवळ स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने होऊ नये, तर रस्त्यावर हैदोस घालणाऱ्या बुलेट गँग आणि अन्य दुचाकीचालकांवर वर्षभर अशाप्रकारे कारवाई केली जावी. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या या वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी केवळ दंडात्मक स्वरूपाची कारवाई करू नये. तर दुसऱ्याचा जीव धोक्यात आणणाऱ्या या हुल्लडबाजांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांना पुढे परवाना, पासपोर्ट मिळणार नाही, अशी कडक कारवाई करावी, असे आवाहन लोकमतने या निमित्ताने केले आहे.
रस्त्यावर हैदोस घालणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: January 28, 2017 1:57 AM