नागपूर : सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाईमध्ये भेसळ केली जाते. नागपूरकरांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. आतापर्यंत ११ दुकानांवर कारवाई करीत २६ हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
विशेष म्हणजे, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा', असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी नागपुरात आले असताना दिले. त्यानंतर तीन दिवसातच अन्न व औषध प्रशासनाने (अन्न) मागील दोन महिन्यातील व २०२०मधील कारवाई दाखवून स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.
सणांच्या दिवसात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मिठाईची मागणी वाढते. भेसळयुक्त पदार्थ आणि अन्नातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने खुल्या मिठाईची विक्री करताना त्यावर उत्पादन तारीख आणि ते कधीपर्यंत वापरावे याची तारीख लिहिणे बंधनकारक केले आहे. मात्र शहरातील मिठाई विक्रेते हा नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यामुळे मिठाईची गुणवत्ता समजत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. शिंगणे यांनी घेऊन १४ सप्टेंबर रोजी नागपुरात आले असताना त्यांनी भेसळ करणाऱ्या असामाजिक तत्त्वांविरोधात कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले. त्यानंतर नागपूरच्या अन्न व औषध प्रशासनाने ६ ऑक्टोबर २०२० पासून ते ३० ऑगस्ट २०२१पर्यंतच्या कारवाईची मोहिमेची माहिती उपलब्ध करून दिली. यात न्यू पकोडेवाला डेली निड्स ॲण्ड बेकरी, राधाकृष्ण टेम्पल, संतोष पकोडेवाला ॲण्ड चाट सेंटर सीतबार्डी, क्रिम कॉर्नर रामदासपेठ, सागर स्नॅक्स ज्यूस ॲण्ड स्विट सेंटर धंतोली, ओमसाई स्विट ॲण्ड फरसाण वाडी, राज स्विट मार्ट सोमलवाडा, गायत्री रेस्टॉरंट हिंगणा रोड, अंबिका स्विट मार्ट गोकुळपेठ, राज भंडार मेन रोड धरमपेठ, अजय रेस्टॉरंट गोकुळपेठ मार्केट व न्यू लक्ष्मी स्विट भंडार गोकुळपेठ आदी दुकानांवर कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे. यातील सहा दुकानांकडून २६ हजार रुपयांचा दंड आकारला असून उर्वरीत पाच दुकाने ही न्यायनिर्णयसाठी दाखल असल्याचे नमूद आहे.